ड्रोन उडवून शूटींग करणार्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
जाहिरात होडिंगचे शूटींगसाठी ड्रोन उडविल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० सप्टेंबर २०२४
मुंबई, – मुंबई शहरात ड्रोन उडविण्यास मुंबई पोलिसांनी बंदी घातली असताना ड्रोन उडवनू शूटींग करणार्या दोघांविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुयश दिलीप गोलतकर आणि हितक जयेश ठक्कर अशी या दोघांची नावे आहेत. जाहिरात होर्डिंगचे शूटींगसाठी त्यांनी ड्रोन उडविल्याचे उघडकीस आले आहे.
दादरच्या नायगाव, नवीन बीडीडी चाळीचे रहिवाशी असलेले अतुल दिपक अहिरे हे वांद्रे पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. पोलीस आयुक्तांच्या आदेशावरुन परिसरात अनधिकृतपणे ड्रोन उडविणे, विविध अस्थापना, हॉटेल, गेस्ट हाऊस, सायबर कॅफे, मोबाईल-सिमकार्ड विक्रेते, भाडेतत्त्वावर राहणार्या भाडेकरु, इस्टेट एजंट आदींची माहिती काढून ती माहिती काढून त्यात काही आक्षेपार्ह दिसून आल्यास वरिष्ठांना अहवाल सादर करणे आदी त्यांच्यावर जबाबदार आहे. सोमवारी एटीएसच्या पथकासोबत ते परिसरात गस्त घालत होते. दुपारी पावणेचार वाजता या पोलीस पथकाला वांद्रे येथील माहीम कॉजवे, उत्तर वाहिनीवर दोनजण ड्रोन उडवून शूटींग करत असल्याचे दिसून आले. मुंबई पोलिसांनी ड्रोन उडविण्यास बंदी घातली असून याबाबत नोटीसद्वारे आदेश पारीत केले होते. तरीही या दोघांनी ड्रोन उडवून शूटींग केल्याचे दिसून आले. त्यामुळे सुयश गोलतकर आणि हितक ठक्कर या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यातील सुयश हा ड्रोन ऑपरेटर असून तो कुर्ला येथे राहतो तर हितक हा फोटोग्राफर असून अंधेरी येथे राहतो.
या दोघांची पोलिसांनी चौकशी केली असता ते दोघेही एका खाजगी कंपनीसाठी काम करतात. याच कंपनीच्या जाहिरातीसाठी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे रोडला लागून असलेले होर्डिंगचे जाहिरात करण्यासाठी व्हिडीओग्राफी करत असल्याचे उघडकीस आले. या कबुलीनंतर त्यांच्याकडील एक लाखांचा ड्रोन कॅमेरा, रिमोट कंट्रोल, ६४ जीबी मेमरी कार्ड, तीन बॅटरी, एक चार्जर आदी मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कंपनीचे त्यांचे मित्र आणि कॉन्ट्रक्टर अमीत कोरे यांच्या सांगण्यावरुन त्यांनी ड्रोनद्वारे शूटींग केले होते. त्यामुळे या दोघांविरुद्ध पोलिसांची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे ड्रोन उडवून शूटींग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीत काहीही संशयास्पद दिसून आले नाही.