कामाच्या दुसर्या दिवशी हातसफाई करुन दहा लाखांची चोरी
अंधेरीतील घटना; मोलकरणीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० सप्टेंबर २०२४
मुंबई, – आजारी आईच्या देखभालीसाठी कामावर ठेवलेल्या एका ३१ वर्षांच्या महिलेने कामाच्या दुसर्याच दिवशी कपाटातील दहा लाख रुपयांच्या सोन्यासह हिरेजडीत दागिने आणि कॅश घेऊन पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी किर्ती समाधान पाटील या महिलेविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
अनिका मंदार दांडेकर ही महिला अंधेरीतील यमुनानगर, परिसरात तिच्या वयोवृद्ध आई अपर्णा रामानंद नाडकर्णी हिच्यासोबत राहते. ती एका खाजगी कंपनीत मॅनेजर म्हणून कामाला आहे. तिचे सासर विलेपार्ले येथे असून आई आजारी असल्याने सध्या ती तिच्यासोबत राहते. नोकरीमुळे आईकडे जास्त वेळ देता येत नसल्याने तिने तिच्या देखभाल करण्यासाठी सिमा जाधव या महिलेस कामावर ठेवले होते. सीमा ही गेल्या दिड वर्षांपासून तिच्याकडे कामावर होती. सीमाच्या मुलीचा वाढदिवस तसेच तिला गौरी गणपतीसाठी गावी जायचे होते. त्यामुळे तिने किर्ती पाटील या महिलेस तीन दिवसांसाठी कामावर ठेवले होते. ६ सप्टेंबरला तिचा कामाचा पहिला दिवस होता. दुसर्या दिवशी तिचा भाऊ तिच्या आईसोबत मुलुंड येथे गणपती पाहण्यासाठी गेले होते. यावेळी घरात किर्ती ही एकटीच होती. सायंकाळी सात वाजता ते सर्वजण घरी आले. यावेळी किर्ती घरात नव्हती. याच दरम्यान किर्तीने कमी पगार मिळत असल्याने ती त्यांच्याकडे काम करणार नाही असे सांगितले.
सोमवारी ९ सप्टेंबरला तिने कपाटाची पाहणी केली असता तिला कपाटातील विविध हिरेजडीत सोन्याचे दागिने आणि ऐंशी हजार रुपयांची कॅश चोरीस गेल्याचे दिसून आले. दहा लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याने तिला धक्काच बसला होता. तीन दिवसांसाठी कामावर ठेवलेल्या किर्तीने ही चोरी करुन पलायन केल्याचा संशय व्यक्त करुन तिने घडलेला प्रकार ओशिवरा पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी किर्ती पाटील हिच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. किर्ती ही डोबिवली येथे राहत असून तिची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. कामाच्या दुसर्या दिवशी किर्तीने हातसफाई करुन कपाटातील दहा लाखांचा मुद्देमाल चोरी केल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.