मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० सप्टेंबर २०२४
मुंबई, – दादरच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएमची डिजीटल लॉक तोडून कंपनीच्या इंजिनिअरने सुमारे १९ लाख रुपयांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी योगेंद्र पटेल या इंजिनिअरविरुद्ध दादर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. चोरीनंतर योगेंद्रने ही कॅश बँकेत जमा केली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
किशलेयकुमार हे नवी मुंबईतील कामोठे परिसरात राहत असून सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बॅकेत व्यवस्थापक म्हणून काम करतात. दादरच्या गोखले रोड, खेडगल्ली, श्री साई विस्मय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बॅकेची एक शाखा असून तिथे ते सध्या शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. बँकेच्या बाजूलाच एनसीआर कंपनीचे एक एटीएम सेंटर असून एटीएम सेवा २४ तास सुरु असते. या एटीएमला ई सव्हेलन्स सिस्टीम ऍक्टिव्ह असून बँक अधिकार्याकडून तिथे पैसे जमा आणि काढले जातात. काही बिघाड झाल्यास एनसीआर कंपनीचे इंजिनिअर कर्मचारी योगेंद्र पटेल हा दुरुस्ती करुन त्याचा रिपोर्ट वरिष्ठांना देतो. ६ सप्टेंबरला बँकेचे कॅशिअर अनिल सुखदरे आणि उपशाखा व्यवस्थापक प्रशांत गडई यांनी एटीएम मशिनमध्ये २७ लाख रुपये जमा केले होते.
रविवारी किशलेयकुमार हे त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना प्रशांत गडई यांनी फोन केला होता. त्यांनी शनिवारी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास योगेंद्र पटेल हा एटीएम सेंटरमध्ये आला होता. त्याने एटीएम मशिनचे लॉक तोडून आतील १९ लाख ६ हजार ९०० रुपये काढून पलायन केले आहे. याबाबत त्याला कॉल करुन विचारणा केली असता त्याने ही रक्कम बँकेत जमा करण्यासाठी येतो असे सांगितले. ठरल्याप्रमाणे तो दुसर्या दिवशी बँकेत आला आणि त्याने ही रक्कम बँकेत जमा केली होती. या घटनेनंतर किशलेयकुमार यांनी दादर पोलीस ठाण्यात योगेंद्र पटेल याच्याविरुद्ध तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे.