बनाना लिफ रेस्ट्रारंटच्या पाच शाखेतील सव्वाकोटीचा अपहार
ऑपरेशन मॅनेजरविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० सप्टेंबर २०२४
मुंबई, – बनाना लिफ रेस्ट्रारंटच्या पाच शाखेतील सुमारे सव्वाकोटी रुपयांचा अपहार करुन मालकांची फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार सांताक्रुज परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी रेस्ट्रारंटचा ऑपरेशन मॅनेजर दिनाथ सुधाकर शेट्टी याच्याविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिनाथवर जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत रेस्ट्रारंटमध्ये जमा झालेली रक्कम बँक खात्यात जमा न करता या रक्कमेचा अपहार केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुरज रघुवीर शेट्टी हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांच्या मालकीचे मुंबई शहरात बनाना लिफ नावाचे पाच रेस्ट्रॉरंट आहेत. याच रेस्ट्रारंटमध्ये दिनाथ शेट्टी हा ऑपरेशन मॅनेजर म्हणून कामाला आहे. पाचही शाखेतील दिवसभराची रक्कम सांताक्रुज येथील जुहू-तारा रोडच्या बनाना लिफच्या मुख्य कार्यालयात जमा होते. त्याची संपूर्ण जबाबदारी दिनाथवर होती. मात्र दिनाथने त्याच्या पदाचा गैरवापर करुन मुख्य कार्यालयात रेस्ट्रारंटची दिवसभराची जमा झालेली सुमारे सव्वाकोटी रुपयांचा परस्पर अपहार करुन हॉटेलच्या मालकाची फसवणुक केली होती. १ जानेवारी ते १ मे २०२४ या कालावधीत हा संपूर्ण गैरव्यवहार झाला होता. अलीकडेच हा प्रकार सुरज शेट्टी यांच्या निदर्शनास आला होता. त्यामुळे त्यांनी दिनाथ शेट्टीकडे विचारणा केली होती. यावेळी त्याने रेस्ट्रारंटच्या सुमारे सव्वाकोटीचा अपहार केल्याची कबुली देताना ही रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्याने काही बोगस दस्तावेज तयार करुन मालकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तीन महिने उलटूनही त्याने अपहाराची रक्कम जमा केली नाही. या घटनेनंतर सुरज शेट्टी यांनी पोलीस उपायुक्त कार्यालयात लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती.
या तक्रारीचे शहानिशा करण्याचे आदेश सांताक्रुज पोलिसांना देण्यात आले होते. संपूर्ण तपास केल्यानंतर पोलिसांनी सुरज शेट्टी यांची जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीनंतर पोलिसांनी दिनाथ शेट्टी याच्याविरुद्ध पोलिसांनी ४०८, ४२०, ४६७, ४७७ अ, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दिनाथ हा मिरारोडच्या गीतानगर क्रमांक तीन, श्रीजी टॉवरचा रहिवाशी आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून दिनाथ शेट्टीची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. याकामी त्याला इतर कोणी मदत केली का, या पैशांचा त्याने कशा प्रकारे विल्हेवाट लावली याचा पोलीस तपास करत आहेत.