मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ सप्टेंबर २०२४
मुंबई, – अंधेरीतील एका विकासकाकडे काम करताना घरातील कपाटातून दहा लाखांचे सोन्याचे दागिने आणि कॅश चोरी मोलकरणीने पलायन केले होते. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी मोलकरणीला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. चंदा लाला मिरधा असे तिचे नाव असून तिच्याकडून साडेनऊ लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर तिला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
सेझीन मोशीन चुनावाला ही महिला अंधेरीतील लोखंडवाला मार्केट परिसरात राहते. तिचे पती विकासक असून ती पूर्वी समर्थ वैभव प्रिटी स्लीम क्लिनिकमध्ये कामाला होती. तिथेच तिची चंदाशी ओळख झाली होती. ती तिथे सफाई कर्मचारी म्हणून कामाला होती. गेल्या दहा वर्षांपासून त्या दोघीही एकमेकांच्या परिचित आहेत. चंदाने तिच्या परिचित नाझिया या महिलेस एक वर्षांपूर्वी तिच्या घरी घरकामास ठेवले होते. तिला कामासाठी आणखीन एका महिलेची गरज होती. त्यामुळे तिने चंदाला तिच्या घरी काम करण्याची ऑफर देत तिला चांगला पगार देते असे सांगितले. त्यास तिने होकार दिला आणि ती एक महिन्यांपासून तिच्याकडे काम करत होती. ५ सप्टेंबरला सेझीन ही कामानिमित्त बँकेत गेली होती. यावेळी घरात चंदा ही एकटीच होती. बँकेचे काम करुन ती दुपारी साडेतीन वाजता घरी आली होती. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता चंदा ही काम करुन तिच्या घरी निघून गेली होती.
रात्री साडेअकरा वाजता तिला तिचा लॉक केलेला कपाट उघडा दिसला. त्यामुळे तिने आतील दागिन्यांसह कॅशची पाहणी केली होती. त्यात तिला चार लाखांचे सोन्याचे दागिने आणि सहा लाखांची कॅश असा सुमारे दहा लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. अज्ञात व्यक्तीने तिच्या घरात प्रवेश करुन ही चोरी केली होती. त्यामुळे तिने ओशिवरा पोलिसांना चोरीची तक्रार करुन घरातील दोन्ही मोलकरीण चंदा मिरधा आणि नाझिया यांच्यावर संशय व्यक्त केला होता. सेझीन चुनावाला यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून चंदाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिनेच ही चोरी केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून चोरीचा साडेनऊ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अटकेनंतर तिला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.