लग्न जुळविणार्या वेबसाईटवर बोगस प्रोफाईलद्वारे फसवणुक
विधवासह घटस्फोटीत महिलांना टार्गेट केल्याचे तपासात उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ सप्टेंबर २०२४
मुंबई, – लग्न जुळविणार्या खाजगी वेबसाईट स्वतची बोगस प्रोफाईल अपलोड करुन लग्नाच्या आमिषाने फसवणुक करणार्या एका ठगाला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. सागर कृष्णकुमार घोसाळकर ऊर्फ सागर गुप्ते असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सागरने आतापर्यंत काही घटस्फोटीसह विधवा महिलांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या अटकेने अशाच इतर काही फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तक्रारदार महिला ही विधवा असून ती गोरेगाव परिसरात राहते. तिने लग्न जुळविणार्या एका खाजगी वेबसाईटवर तिची माहिती अपलोड केली होती. फेब्रुवारी २०२४ रोजी तिची सागर गुप्ते नाव सांगणार्या एका व्यक्तीशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांच्यात मैत्री झाली होती. काही दिवसांनी त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. तिचा विश्वास संपादन करुन तो तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. हिमाचल प्रदेश येथे कुटुंबियांसोबत तिला फिरायला घेऊन जातो असे सांगून त्याने तिच्याकडून ५६ हजार रुपये घेतले होते. मात्र त्याने तिला सहलीसाठी नेले होते. याबाबत विचारणा केल्यानंतर तो विविध कारण सांगून तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तिने तिच्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र पैसे न देता त्याने तिची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच तिने सागर गुप्तेविरुद्ध बांगुरनगर पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे यांनी गंभीर दखल घेत त्यांच्या पथकाला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक तांबे, पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील, पोलीस हवालदार बळीराम गोवळकर, किशोर तावडे यांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सागर गुप्ते ऊर्फ सागर घोसाळकर याला गोरेगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्याने तक्रारदार महिलेची फसवणुक केल्याची कबुली दिली. सागर हा गोरेगाव येथील एम. जी रोड, एलटी नगर रोड क्रमांक पाचचा रहिवाश आहे. त्याचा स्वतचा व्यवसाय आहे. त्याने लग्न जुळविणार्या खाजगी वेबसाईट वेगवेगळ्या नावाने बोगस प्रोफाईल अपलोड केले होते. त्यानंतर तो घटस्फोटीत तसेच विधवा महिलांना टार्गेट करत होता. त्यांच्याशी मैत्री करुन त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची फसवणुक करत होता. त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी सागर गुप्ते ऊर्फ सागर घोसाळकर याला अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.