बोगस एपिके फाईलच्या माध्यमातून महिलेची फसवणुक

तेरा लाखांच्या फसवणुकीप्रकरणी सायबर ठगाविरुद्ध गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ सप्टेंबर २०२४
मुंबई, – बोगस एपिके फाईलच्या माध्यमातून एका महिलेची अज्ञात सायबर ठगाने सुमारे तेरा लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मध्य प्रादेशिक सायबर सेलने अज्ञात ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. विशेष म्हणजे तिने लिंकवरील बँकेच्या पेजवर तिची कुठलीही माहिती शेअर केली नसताना तिच्या बँक खात्यातून तेरा लाख वीस हजार रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर झाले होते.

जैनब मुर्तुझा वागलावला ही महिला माझगाव येथे राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. २७ जुलैला ती तिच्या घरी होती. यावेळी तिला एका अज्ञात व्यक्तीने बँकेचा अपडेट ऍप करण्याबाबत एक मॅसेज पाठविला होता. त्यामुळे तिने मॅसेजमधील लिंक ओपन केली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर बँकेचे पेज ओपन झाले होते. मात्र तिने त्यात तिची कुठलीही माहिती अपलोड केली नव्हती. तरीही तिच्या मोबाईलवर काही ओटीपी क्रमांक आले होते. ते मॅसेज दुसर्‍याच मोबाईलवर फॉरवर्ड होत होते. मात्र ते ओटीपी क्रमांक दुसर्‍या मोबाईल कसे फॉरवर्ड होत आहे याबाबत तिला काही समजत नव्हते. काही वेळानंतर तिला तिच्या बँकेचे काही मॅसेज प्राप्त झाले होते. त्यात तिच्या बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार होऊन १३ लाख २० हजार रुपये डेबीट झाले होते. मॅसेजमधील लिंक ओपन करुन कुठलीही माहिती अपलोड केली नसताना तिचा मोबाईल हॅक करुन अज्ञात सायबर ठगांनी मोबाईलवर आलेले ओटीपी दुसर्‍या मोबाईलवर वर्ग करुन ही फसवणुक केली होती.

हा प्रकार उघडकीस येताच तिने सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात अज्ञात सायबर ठगाने एपिके फाईलद्वारे ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले. या फाईलला ऍड्राईड पॅकेज किट म्हटले जाते. या किटचा वापर सायबर गुन्हे करण्यासाठी केला जातो. एखाद्याचा मोबाईलसह बँक खात्याची माहिती या फाईलद्वारे मिळविता येते. त्यामुळे सायबर ठग तुमच्या बँक खातीसह सोशल मिडीया आणि वैयक्तिक ईमेलवर प्रवेश करतात. त्यानंतर त्यात फेरफार करुन ही फसवणुक केली जात असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page