रुपाली चाकणकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल
रुपाली चाकणकर यांच्या तक्रारीनंतर सायबर सेलची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – सोशल मिडीयावर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी दोन आरोपींना दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. सनी कारभारी पारखे आणि जगन्नाथ दिलीप हाटे अशी या दोघांची नावे असून यातील सनी हा गंगापूरच्या बाहेगाव तर जगन्नाथ हा चुन्नाभट्टीच्या मुक्तादेवीनगरचा रहिवाशी आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महिला शाखेच्या अध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी दुजोरा दिला आहे.
काही महिन्यांपूर्वी रुपाली चाकणकर यांच्याविरुद्ध सोशल मिडीयावर काही अज्ञात व्यक्तींनी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक पोस्ट व्हायरल केली होती. इंटाग्राम आणि फेसबुकवर संबंधित पोस्ट व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्या वतीने मुंबईसह पुण्यात तक्रार करण्यात आली होती. वरिष्ठांच्या आदेशानंतर मुंबईतील तक्रारीचा तपास दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर सायबर सेल पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी ३५४ डी, ५०९, ३४ भादवी सहकलम आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु होता. हा तपास सुरु असतानाच संबंधित आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणार्या सनी पारखे याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत जगन्नाथ हाटे याचा सहभागाचे काही पुरावे सापडले होते, त्यानंतर त्यालाही चुन्नाभट्टी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत या दोघांचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.