मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – मुंबई-जयपूर प्रवासादरम्यान चेकिंगदरम्यान ठाण्यातील एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची सुमारे दहा लाखांची कॅश अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीच्या एकोणीस दिवसानंतर या व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. विमानतळावरील सीसीटिव्ही फुटेजवरुन पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे.
जितेंद्र सागरमल चौधरी हे व्यावसायिक असून ठाण्यातील घोडबंदर रोड, चितळसर परिसरात राहत असून त्यांचा स्वतचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. २७ ऑगस्टला ते जयपूरला त्यांच्या गावी जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळावर आले होते. बॅगेची तपासणी झाल्यानंतर ते सायंकाळी साडेसहा वाजता विमानात बसले होते. रात्री नऊ वाजता ते जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांनी त्यांची बॅग घेतली होती. यावेळी त्यांना त्यांच्या बॅगेची चैनसोबत छेडछाड झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी बॅगेची तपासणी केली होती. त्यात त्यांना त्यांची पिवळ्या रंगाची कापडी पिशवी दिसून आली. या पिशवीत सुमारे दहा लाखांची कॅश होती. त्यांच्या गावी त्यांच्या घराचे बांधकाम सुरु होते. त्यासाठी त्यांनी ती कॅश आणली होती. मात्र प्रवासादरम्यान अज्ञात व्यक्तीने दहा लाखांची ही पिशवी चोरी केली होती.
१४ सप्टेंबरला ते मुंबईत परत आले होते. त्यानंतर त्यांनी सहार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. मुंबईसह जयपूर विमानतळावरील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. मुंबई-जयपूर प्रवासादरम्यान बॅगेची तपासणीदरम्यान ही कॅश चोरी झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.