मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – ताडदेव परिसरात एका व्यावसायिकाच्या घरी झालेल्या सुमारे ३५ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात ताडदेव पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एका मुख्य आरोपीस उल्हासनगर येथून पोलिसांनी अटक केली. एजाज अहमद अब्दुल करीम चौधरी असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरीचा साडेपाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटकेंनतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत सुरज ऊर्फ आशिष जिलेदार सिंग, बिलाल करीम चौधरी, बिलालचा मित्र बटका सुरज, अंकुश असुरभा जाधव या चौघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अटक व पाहिजे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून गेल्या दहा वर्षांत त्यांच्याविरुद्ध व्ही. पी रोड, वाशी, मानपाडासह इतर पोलीस ठाण्यात अनेक घरफोडीसह इतर गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
व्यवसायाने व्यावसायिक असलेले राजू रमेश शेट्टी हे त्यांच्या कुटुंबियांसोबत ताडदेव येथील सोनावाला कंपाऊंड, ३/ए विंगच्या सातव्या मजल्यावर राहतात. ३१ जुलै ते ५ सप्टेंबर या कालावधीत त्यांच्या राहत्या घरी प्रवेश करुन अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. या चोरट्यांनी घरातील कपाटासह बँक लॉकरमधील विविध सोन्याचे दागिने, कॅश आणि इतर वस्तू असा ३५ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी ताडदेव पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी उल्हासनगर येथील कृष्णानगर, साई श्रद्धा अपार्टमेंटमध्ये राहणार्या एजाजला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने इतर चार आरोपींच्या मदतीने ही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात सोळाहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात उघडकीस आले. चोरीचे काही मुद्देमाल त्यांनी किरण बाबूराव सावंत आणि अक्षय गोरख यादव यांना विक्री केले होते. त्यामुळे या दोघांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांच्याकडून चोरीचे विक्री केलेला काही मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
चोरीनंतर या सर्वांनी सर्व मुद्देमालाची समान विभागणी केली होती. त्यानंतर ते सर्वजण पळून गेले होते. या पाचही आरोपीविरुद्ध अनेक घरफोडीच्या गुन्हयांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. त्यातील काही गुन्ह्यांत त्यांना शिक्षा झाली आहे. पळून गेलेल्या चारही आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्या अटकेने घरफोडीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.