फ्लॅटसाठी तीन कोटीचा अपहारप्रकरणी आरोपीस अटक
फ्लॅट खरेदीसह हेव्ही डिपॉझिटचे बोगस दस्तावेज बनवून फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – फ्लॅटसाठी घेतलेल्या तीन कोटीचा अपहारप्रकरणी वॉण्टेड असलेल्या इरफान अहमद शकील अहमद पटेल या मुख्य आरोपीस एक वर्षांनी आंबोली पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यांत ओबेद सलीम मर्चंट, आमीर अफजल खांडवाला, नदीम अहमद कासमानी, मोहम्मद आसिफ अब्दुल अजीज मेमन, शकील अली मोहम्मद बावरा, नईम आणि इतर एका अनोळखी व्यक्तीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठ पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. फ्लॅट खरेदीसह हेव्ही डिपॉझिटचे बोगस दस्तावेज बनवून या टोळीने ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे.
२३ वर्षांचा मोहम्मद इलियास बुरानुद्दीन शेख हा जोगेश्वरीतील बांदिवली हिल रोड, विजय हाईट्स अपार्टमेंटच्या डी विंगच्या फ्लॅट ७१३ मध्ये राहतो. तो एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांना फ्लॅट खरेदीमध्ये गुंतवणुक करायची होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान ऑक्टोंबर २०२२ रोजी त्यांनी संबंधित आरोपींशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांनी त्यांना जोगेश्वरी परिसरात दोन फ्लॅट स्वस्तात देण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी एक फ्लॅट त्यांच्या कुुटुंबियांसासाठी तसेच दुसरा फ्लॅट कमी किंमत विकत घेऊन नंतर त्याची जास्त भावाने विक्री करण्याचा सल्ला त्यांनी त्यांना दिला होता. त्यांची ही ऑफर चांगली होती, त्यामुळे त्याने त्यांच्याकडे दोन फ्लॅटसाठी प्रयत्न करण्याबाबत विचारणा केली होती. याच दरम्यान या सर्व आरोपींनी विश्वास संपादन करुन त्याच्याकडून फ्लॅटसाठी टप्याटप्याने १ ऑक्टोंबर २०२२ ते ३० जून २०२३ या कालावधीत सुमारे तीन कोटी रुपये घेतले होते. फ्लॅट खरेदीचा बहाणा करुन त्याला तो फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर देण्यात आल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी फ्लॅटसह हेव्ही डिपॉझिट कराराचे बोगस दस्तावेज बनवून त्याला दिले होते. मात्र फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांचा अपहार करुन या टोळीने मोहम्मद इलियास याची फसवणुक केली होती.
हा प्रकार नंतर त्याच्या निदर्शनास आला होता. त्यानंतर त्याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र वारंवार विचारणा करुनही त्यांनी त्याला फ्लॅटसाठी घेतलेले तीन कोटी रुपये परत केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच सप्टेंबर २०२३ रोजी त्याने संबंधित सर्व आरोपीविरुद्ध आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर इरफान अहमद पटेल या मुख्य आरोपीसह ओबेद सलीम मर्चंट, आमीर अफजल खांडवाला, नदीम अहमद कासमानी, मोहम्मद आसिफ अब्दुल अजीज मेमन, शकील अली मोहम्मद बावरा, नईम आणि इतर एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध ४०६, ४२०, ४०९, ५०६, ४६५, ४६८, ४७१, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सर्वजण पळून गेले होते. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या एक वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या इरफान अहमद पटेल याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यानेच इतर आरोपींच्या मदतीने ही फसवणुक केल्याची कबुली दिली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या गुन्ह्यांत फरार असलेल्या आरोपींच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.