विसर्जनाच्या बंदोबस्तात असलेल्या महिला पोलिसांचा विनयभंग
कांदिवलीतील घटना; रेकॉर्डवरील गुन्हेगारासह चौघांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – अनंत चतुदर्शीच्या दिवशी गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तात असलेल्या एका पोलीस शिपायाशी हुज्जत घालून धक्काबुक्की करुन तिचा विनयभंग झाल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका रेकॉर्डवरील गुन्हेगारासह त्याच्या तीन सहकार्यांना कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. हरिश मांडवीकर, दिपक पांडे, सुभाष चौधरी आणि राजहंस कोकीसरेकर अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील हरिश हा मटका किंग सुरेश भगत यांच्या हत्येतील आरोपी असून त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देणे, गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्रे बाळगणे आदी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गणपती विसर्जनादरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. बंदोबस्तात अजिबात हलगर्जीपणा खपवून घेतली जाणार आहे अशी सक्त ताकिद दिली होती. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यांची परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. कांदिवलीतील डहाणूकरवाडी तक्रारदार पोलीस शिपाई महिला कर्तव्य बजावत होती. मंगळवारी सायंकाळी हरिश मांडवीकर तिथे आला होता. तो प्रतिबंधित परिसरात जात होता. यावेळी त्याला या महिला शिपायाने थांबवून दुसर्या बाजूने जाण्याचा सल्ला दिला होता. याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्याने तिला शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने तिच्याशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार निदर्शनास येतच पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी हरिशच्या इतर तीन सहकार्यांनी पुन्हा पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. वातावरण तंग होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी बळाचा वापर करुन या चौघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
या महिला शिपायाच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी हरिशसह चारही आरोपीविरुद्ध महिला पोलिसांशी उद्धट वर्तन करुन धक्काबुक्की करुन विनयभंग करणे तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी या चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत चौघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर चारही आरोपींना बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हरिश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध हत्येसह खंडणीसाठी धमकी देणे, हत्येचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे असे दहाहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याने मटका किंग सुरेश भगत याची हत्या केली होती. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती. यातील काही गुन्ह्यांत तो जामिनावर बाहेर आला. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने परिसरात पुन्हा स्वतची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.