बँकॉंकहून आलेल्या बांगलादेशी महिलेस अटक व कोठडी
आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकार्यांची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – बँकॉंकहून आलेल्या आरफीना मोहम्मद सादिक शेख या महिलेस छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकार्यांनी ताब्यात घेऊन सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. बोगस भारतीय दस्तावेजाच्या आधारे पासपोर्ट मिळवून विदेशात प्रवास केल्याप्रकरणी तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत आहे. यापूर्वी यापूर्वी तिच्या आईला पोलिसांनी अशाच गुन्ह्यांत अटक करुन तिला बांगलादेशात पाठविल्याचे पोलिसांनी सांगितले.
रविवारी रात्री उशिरा आरफीना ही मलेशियाच्या बँकॉंक येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. तिच्या पासपोर्टची पाहणी केल्यानंतर इमिग्रेशन अधिकार्याला ती अनेकदा बांगलादेशात गेल्याचे दिसून आले. तसेच बोलीभाषेवरुन ती बांगलादेशी नागरिक असल्याचा संशय निर्माण झाला होता. त्यामुळे तिला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिने ती बांगलादेशी नागरिक असल्याचे सांगितले. ती तिच्या आई-वडिलांसोबत बांगलादेशातून भारतात आली होती. आठ वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर ती तिच्या आईसोबत राहत होती. २०१४ साली तिची आई रुबीना खातून मोहम्मद खातून शेख हिला ठाणे पोलिसांनी संशयावरुन ताब्यात घेतले होते. ती बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आल्यानंतर तिच्यावर खटला सुरु झाला होता. याच गुन्ह्यांत शिक्षा भोगल्यानंतर तिला बांगलादेशात पाठविण्यात आले होते. त्यानंतर आरफीनाने जितेश नावाच्या एका व्यक्तीशी विवाह केला होता. मात्र विवाहानंतर तिने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता तसेच भारत सरकारकडे भारतीय नागरिकत्वासाठी कायदेशीर अर्ज केला नव्हता. पतीच्या नावाने तिने आधारकार्ड, पॅनकार्डसह इतर बोगस भारतीय बोगस दस्तावेज मिळविले. त्यानंतर तिने उल्हासनगर येथून भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला होता. पासपोर्ट मिळाल्यांनतर ती अनेकदा बांगलादेशात तिच्या आईला भेटण्यासाठी गेली होती.
८ सप्टेंबरला ती बँकॉकला गेली होती. त्यानंतर ती १५ सप्टेंबरला बँकॉंकहून पुन्हा मुंबईत आली होती. मात्र तिच्या पासपोर्टवरील बांगलादेशातील व्हिसामुळे तिचे पितळे उघडे पडले. ती बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आल्यानंतर तिला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. याप्रकरणी सुषमा मच्छिंद्र टाकळकर यांच्या तक्रारीवरुन सहार पोलिसांनी आरफीना शेखविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन भारतीय पासपोर्ट मिळवून विदेशात प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. अटकेनंतर तिला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.