मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – कुर्ला येथील एका खाजगी हॉस्पिटलमधून रुटीन चेकअपनंतर घरी जात असताना कारचालकाने ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय दिल्याने कुर्ला येथील अपघातात राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे आमदार नवाब मलिक यांचा जावई गंभीररीत्या जखमी झाला तर त्यांची विवाहीत मुलीला किरकोळ दुखापत झाली होती. समीर खान असे या जावयाचे नाव असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर एका खाजगी हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी अब्दुल अन्सारी या कारचालकाविरुद्ध विनोबा भावे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
आमदार नवाब मलिक हे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे अजीत पवार गटाचे आमदार आहेत. त्यांची निलोफर ही मुलगी असून तिचा समीर खान हा पती आहे. मंगळवारी ते दोघेही कुर्ला येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये रुटीन चेकअपसाठी आले होते. चेकअपनंतर ते दोघेही त्यांच्या कारमधून घरी जाण्यासाठी निघाले होते. समीर खान आणि निलोफर खान हे कारमध्ये बसत असताना त्यांचा कारचालक अब्दुलने कार सुरु केली. त्याने ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय दिल्याने गाडी वेगाने पुढे जाऊन दुचाकींना धडक देत समोरच्या एका संरक्षक भिंतीवर जाऊन आदळली. या अपघातात समीर आणि निलोफरला तातडीने जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे निलोफरला प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले तर समीरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर होती. अपघाताची माहिती मिळताच विनोबा भावे नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी कारचालक अब्दुल अन्सारीविरुद्ध पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.