पंधरा वर्षांच्या मुलीवर वयोवृद्धाकडून लैगिंक अत्याचार
धारावीतील घटना; ६० वर्षांच्या वयोवृद्ध आरोपीला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा तिच्याच शेजारी राहणार्या वयोवृद्धाकडून विनयभंगासह लैगिंक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार धारावी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन धारावी पोलिसांनी वयोवृद्धाविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला या गुन्ह्यांत अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
३८ वर्षांची तक्रारदार महिला ही धारावी येथे राहत असून खाजगी नोकरी करते. तिला पंधरा वर्षांची एक मुलगी आहे. मंगळवारी दुपारी बारा वाजता ती तिच्या घरी एकटीच होती. यावेळी तिच्या शेजारी राहणारा मोहम्मद जाफर हा तिच्या घरी आला होता. ती एकटीच असल्याचा फायदा घेऊन त्याने तिच्या गळ्यावर चाकू लावून तिला जखमी केले होते. ओरडण्याचा प्रयत्न केल्यास तिला जिवे मारण्याची धमकी देत त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. काही वेळानंतर त्याने तिचे कपडे काढून तिच्या छातीला अश्लील स्पर्य करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगितला तर त्याने तिला ऍसिड हल्ल्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याने कपाटातील काही सोन्याचे दागिने चोरीचा प्रयत्न केला होता. कामावरुन तिची आई घरी आल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर या दोघींनी धारावी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या महिलेच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी ६५ (१), ३५१ (३), ३१२ भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी वयोवृद्धाला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
चाकूने गळ्यावर दुखापत झाल्याने पिडीत मुलीला नंतर सायन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथेच तिची मेडीकल करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात पिडीत मुलगी राहत असलेल्या मजल्यावर आरोपी वयोवृद्ध राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. पिडीत मुलीची आई कामावर जात असल्याने ती एकटीच घरी असल्याची त्याला माहिती होती. त्यामुळे मंगळवारी दुपारी तो तिच्या घरी गेला आणि त्याने तिला जिवे मारण्यासह ऍसिड हल्ल्याची धमकी देत तिचा विनयभंगासह लैगिंक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मंगळवारी दुपारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रंचंड संतापाची लाट उसळली होती.