शुद्ध सोन्याच्या मोबदल्यात दागिने घेऊन व्यापार्‍याची फसवणुक

५९ लाखांच्या अपहारासह फसवणुकीप्रकरणी व्यापार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – शुद्ध सोन्याच्या मोबदल्यात विविध सोन्याचे दागिने घेऊन एका ज्वेलर्स व्यापार्‍याची त्याच्याच परिचित व्यापार्‍याने सुमारे ५९ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार झव्हेरी बाजार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अशोक चांदमलजी जैन या व्यापार्‍याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच अशोक जैन हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

दिलीप दालचंद चंदालिया हे ज्वेलर्स व्यापारी असून ते चिंचपोकळीच्या लालबागचे रहिवाशी आहेत. त्यांचा सोन्याचे दागिने होलसेलमध्ये विक्रीचा व्यवसाय असून झव्हेरी बाजार येथे त्यांच्या मालकीचे भैरव गोल्ड नावाचे एक दुकान आहे. या व्यवसायात त्याचे वडिल दालचंद चंदालिया, भाऊ हितेश चंदालिया, प्रदीप चंदालिया हे तिघेही पार्टनर आहेत. ते व्यापार्‍यासह शोरुममधील व्यावसायिकांना त्यांच्या ऑर्डरप्रमाणे दागिने बनवून त्याची विक्री करतात. चालू वर्षी एप्रिल महिन्यांत त्यांची साक्षी गोल्ड दुकानाचे मालक अशोक जैन यांच्याशी ओळख झाली होती. ते दोघेही ज्वेलर्स व्यापारी असल्याने काही दिवसांनी त्यांच्यात सोन्याचा खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरु झाला होता. सुरुवातीला अशोक जैन याने त्यांच्याकडून गोल्डसह सोन्याचे दागिने घेतले आणि त्याचे पेमेंट वेळेवर देऊन त्यांचा विश्‍वास संपादन केला होता. त्यानंतर अशोक जैन त्यांना सतत फोन करुन त्यांच्याकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत होता. त्यामुळे त्यांनी त्यांचा पुतण्या जिनीत संजय जैन याला अशोक जैन याच्या दुकानात दोन किलो विविध सोन्याचे दागिने दाखविण्यासाठी पाठविले होते. त्यापैकी ५९ लाख ३१ हजार रुपयांचे ८४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अशोक जैन यांनी पसंद केले होते.

या दागिन्यांच्या मोबदल्यात त्याने त्यांना शुद्ध सोने देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना शुद्ध सोने किंवा दागिन्यांचे पेमेंट केले नाही. वारंवार विचारणा करुनही त्याच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी अशोक जैन याच्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन दिलीप चंदालिया यांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून पळून गेलेल्या अशोक जैन याचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page