ऍक्शन मोडमध्ये येण्यापूर्वीच छोटा राजनचा हस्तक गजाआड
स्वतच्या सुरक्षेसाठी पिस्तूल बाळगत असल्याचे तपासात उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – दोन हत्येसह हत्येचा प्रयत्न, दरोडा, रॉबरी आणि घातक शस्त्रे बाळगणे अशा आठहून अधिक गुन्ह्यांत जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा ऍक्शन मोडवर येण्याच्या तयारीत असलेल्या छोटा राजन टोळीशी संबंधित एका हस्तकाला गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी वरळी येथून गजाआड केले. शाम तांबे ऊर्फ सॅव्हिओ रॉड्रिक्स असे या हस्तकाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, तीन राऊंड जप्त केले आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला स्थानिक न्यायालयाने गुरुवार २९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे यांनी सांगितले.
शाम तांबे हा छोटा राजनचा एकेकाळचा खास सहकारी असून तो घातक शस्त्रांसह वरळी परिसरात येणार असल्याची माहिती युनिट तीनच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त चेतन काकडे, प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शामराव पाटील, पोलीस हवालदार आकाश मांगले, राहुल अनभुले, सुहास कांबळे, भास्कर गायकवाड, शिवाजी जाधव यांनी वरळीतील जिजामाता नगर, कृष्णा हॉटेल परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. सोमवारी सायंकाळी तिथे शाम तांबे आला असता त्याला पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन राऊंड सापडले.
चौकशीदरम्यान सतीश हा छोटा राजनचा खास सहकारी म्हणून ओळखला जात होता. छोटा राजनच्या इशार्यावरुन त्याने अनेक गुन्हे केले होते. त्याच्याविरुद्ध दोन हत्या, दोन हत्येचा प्रयत्न, रॉबरी, दरोडा, घातक शस्त्रे बाळगणे अशा आठहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत तो कारागृहात होता. जानेवारी २०१९ रोजी तो कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. तेव्हापासून तो शांत होता, मात्र छोटा राजन टोळीचा टॅग असल्याने तो गुन्हेगारी जगतात पुन्हा सक्रिय होण्याच्या तयारीत होता. त्यासाठी त्याने देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन राऊंड घेतले होते. अटकेनंतर त्याने ते घातक शस्त्रे स्वतच्या सुरक्षेसाठी ठेवल्याची कबुली दिली. मात्र घातक शस्त्रे स्वतजवळ बाळगताना त्याने त्याची नोंद केली नव्हती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी कारवाई करुन त्याला या गुन्ह्यांत अटक केल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे यांनी सांगितले. त्याला ते पिस्तूल कोणी दिले, ते पिस्तूल त्याने कोठून आणले याचा आता पोलीस तपास करत आहेत. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.