लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत चोरट्यांची हातसफाई

सहा महिलांचे सोनसाखळीसह फोटोग्रोफरचा कॅमेरा व लेन्स पळविला

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – मुंबईचा राजा आणि लालबागचा राजाच्या गणपती विसर्जनादरम्यान असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी हातसफाई केल्याचे उघडकीस आले आहे. सहा महिलेचे सोनसाखळीसह इतर दागिने आणि एका फोटोग्राफरचा महागडा कॅमेरासह लेन्स चोरट्यांनी पळविला. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी तीन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली असून दोन महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे तर इतर काही आरोपींचा शोध सुरु आहे. सोनसाखळी, मोबाईल, वॉलेट चोरीचे इतर काही गुन्हे घडले असून याबाबत काही तक्रारदार तक्रार करण्यासाठी येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मंगळवारी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गणेशभक्त रस्त्यावर उतरले होते. त्यात मुंबईचा राजा आणि लालबागचा राजाच्या गणपती विसर्जननासाठी प्रचंड गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेऊन काही अज्ञात चोरट्यांनी हातसफाई केली होती. लालबागचा राजाच्या मिरवणुक सामिल झालेल्या पुष्पा राजेंद्र अग्रवाल, संध्या विश्‍वनाथ पोफळकर, अनुष्का अरविंद मसुरकर, हेमलता शंकर कुशाले, प्रभावती चंद्रकांत नागपूरे या पाच महिलांचे सोनसाखळीसह इतर दागिने चोरट्याने पळविले होते. हा प्रकार उघडकीस येताच या पाचही महिलांनी काळाचौकी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

दुसर्‍या घटनेत अमृता निलेश माने ही महिला मुंबईचा राजाच्या मिरवणुकीत सामिल झाली होती. यावेळी तिची ७५ हजाराची सोनसाखळी अज्ञात महिलेने चोरी केली होती. याप्रकरणी सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल होताच स्वाती पिंटू जाधव आणि मनिषा किरण शिंदे या दोन महिलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिसर्‍या घटनेत तेजस राजेंद्र गावडे या फोटोग्राफरचा महागडा कॅमेरा आणि लेन्स असा एक लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने पळविला. याप्रकरणी तेजस गावडेच्या तक्रार अर्जावरुन काळाचौकी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल आहे. अशाच प्रकारे गर्दीचा फायदा घेऊन मिरवणुकीत मोबाईल, सोनसाखळी आणि वॉलेट चोरीच्या काही घटना घडल्या असून काहीजण अद्याप तक्रार करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सागितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page