मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – पूर्ववैमस्नातून मोहम्मद सादिक रजा खान या ३२ वर्षांच्या सफाई कर्मचार्यावर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना धारावी परिसरात घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या मोहम्मद सादिकला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच दिलशाद सलीम शेख या २६ वर्षांच्या मुख्य आरोपीस धारावी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना रविारी रात्री पावणेनऊ वाजता धारावीतील मच्छीगल्ली, ९० फिट रोडवर घडली. मोहम्मद सादिक हा सफाई कर्मचारी असून मुकूंदनगर, जे.एन.एम ए ८५/३, संजय चाळ कमिटीचा रहिवाशी आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्यासह त्याच्या मित्राचे दिलशादसोबत क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. याबाबत दिलशादने दोघांची माफी मागितली होती. त्यामुळे त्यांनी त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली नव्हती. मात्र नंतर त्याच्या मित्राने त्याला त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यास सांगितले होते. त्याचा दिलशादच्या मनात राग होता. याच रागातून त्याने मोहम्मद सादिकच्या मानेवर चाकूने वार केले होते. त्यात त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या सायन रुग्णालयात दाखल कण्यात आले होते. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. याप्रकरणी मोहम्मद सादिकच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दिलशाद शेख याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. दिलशाद हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध धारावी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्नासह गंभीर दुखापत करुन रॉबरी करणे, घरफोडीचे चार गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.