मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – बालविवाह केलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी तिच्याच २० वर्षांच्या पतीला पवई पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भान्याससह पोक्सो आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलगी पाच महिन्यांची गरोदर असून तिला उपचारासाठी सांताक्रुजच्या व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पिडीत मुलगी सतरा वर्षांची असून ती तिच्या पतीसोबत पवई परिसरात राहते. तिचा पती बेकरी कामगार असून जानेवारी महिन्यांत तिचे पिडीत मुलीशी मुस्लिम पद्धतीने लग्न झाले होते. ही मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असताना तिच्या पालकांनी तिच्या मनाविरुद्ध तिचे आरोपीसोबत बालविवाह लावून दिला होता. जानेवारी ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत ती तिच्या पतीसोबत पवईतील घरी राहत होती. यावेळी आरोपी पतीने ती अल्पवयीन असल्याचे माहित असताना तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. ही माहिती नंतर पवई पोलिसांना समजली होती. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून शहानिशा करण्यात आली होती. चौकशीदरम्यान पिडीत मुलीची पोलिसांनी जबानी नोंेदवून घेतली होती. तिच्या चौकशीतून हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी स्वतहून आरोपी पतीसह इतर आरोपीविरुद्ध ६४, ६४ (२), (एम) भारतीय न्याय सहिता सहकलम४, ५ (एल), ५ (जे), (२), ६, ९, १०, ११ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी पतीला अटक केली. अटकेनंतर त्याला मंगळवारी विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत दोन्ही कुटुंबियांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचीही लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.