मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ सप्टेंबर २०२४
मुंबई, – बॉलीवूडचा भाईजान सलमान खान यांचे वडिल आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान यांना पुन्हा धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिष्णोई को भेजू क्या अशी धमकी देऊन पळून गेलेल्या स्कूटीचालकासह महिलेस काही तासांत वांद्रे पोलिसांनी अटक केली. त्यात उमर आसिफ या तरुणासह त्याच्या प्रेयसीचा समावेश आहे. या धमकी देण्यामागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. मात्र थट्टामस्करी केलेली ही मस्करी त्यांच्या चांगलीच अंगलट आली आहे.
सलीम खान हे बॉलीवूडचे प्रसिद्ध लेखक म्हणून परिचित असून त्यांनी आतापर्यंत अनेक बॉलीवूड चित्रपटासाठी कथा लिहिली आहे. सलीम खान हे बॉलीवूड अभिनेता सलमान खान याचे वडिल असून ते सध्या वांद्रे येथील बी. जे रोड, बॅण्डस्टॅण्डजवळील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतात. ते सकाळी नियमित मार्निंग वॉकसाठी जातात. बुधवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे मार्निंग वॉकसाठी गेले होते. सकाळी पावणेनऊ ाजता ते विंडरमेरे इमारतीसमोरील प्रमोनाडमधील कट्ट्यावर बसले होते. याच दरम्यान तिथे स्कूटी आली होती. या स्कूटीवर चालकासह मागे एक महिला बसली होती. सलीम खान यांच्या जवळ आल्यानंतर या दोघांनी लॉरेन्स बिष्णोई को भेजू क्या अशी धमकी देऊन तेथून पळ काढला होता. यावेळी तिथे उपस्थित संरक्षण व सुरक्षा विभागाचा पोलीस हवालदार दिपक बोरसे यांनी पळून जाणार्या स्कूटीचालकाचा पाठलाग केला, मात्र तो सुसाट वेगाने पळून गेला होता. घडलेला प्रकार दिपक बोरसे यांनी वांद्रे पोलिसांना सांगून स्कूटीचालकासह महिलेविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी या दोघांविरुद्ध पोलिसांनी ३५३ (२), २९२, ३ (५) भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पोलिसांनी स्कूटीचा क्रमांक प्राप्त केला होता. याच क्रमांकावरुन पळून गेलेल्या उमर आसिफ व त्याचा प्रेयसी या दोघांना काही तासांत पोलिसांनी अटक केली. तपासात उमर हा शिवडी परिसरात राहत असून त्याचा कपड्याचा व्यवसाय आहे. बुधवारी उमर हा त्याच्या प्रेयसीसोबत त्याच्या स्कूटीवरुन वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्डजवळ फिरायला आले होते. सलमान आणि सलीम खान यांना ओळखत असल्याने ते दोघेही सलीम खान यांच्याकडे गेले. त्यानंतर त्यांनी त्यांना मस्करीत लॉरेन्स बिष्णोई को भेजू क्या असे बोलून तेथून पलायन केले होते. मात्र मस्करीत दिलेली धमकी त्यांच्या चांगलीच अंगलट आली आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून याच गुन्ह्यांत नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर या दोघांनाही गुरुवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.