पुर्नविकास इमारतीमध्ये फ्लॅटच्या आमिषाने महिलेची फसवणुक
सतरा लाखांच्या अपहारप्रकरणी तीन भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ सप्टेंबर २०२४
मुंबई, – अंधेरीतील एका पुर्नविकास इमारतीमध्ये स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची त्रिकुटाने सुमारे सतरा लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमोल कर्पे, शादाब शेख आणि चंद्रशेखर उमाशंकर शुक्ला या तीन भामट्याविरुद्ध आंबोली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या तिघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.
३२ वर्षांचे तक्रारदार शिन भरत दास त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाडच्या जनकल्याण नगर परिसरात राहते. फेब्रुवारी महिन्यांत तिची अमोल, शादाब आणि चंद्रशेखर यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान या तिघांनी त्यांना अंधेरीतील एच. पी पेट्रोलपंप, अपना बाजारसमोरील सहकार नगर परिसरातील पुर्नविकासातर्ंगत बांधकाम सुरु असलेल्या एव्हरस्माईल सहकारी सोसायटीमध्ये एक फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. चर्चेअंती त्यांनी तिला नवव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ९०४ अलोट करतो असे सांगितले होते. १० फेब्रुवारी ते ३० जून २०२४ या कालावधीत याच फ्लॅटसाठी त्यांच्याकडून या तिघांनी टप्याटप्याने सतरा लाख अकरा हजार रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत तिला फ्लॅटचा ताबा किंवा फ्लॅटचे कागदपत्रे दिली नाही. या तिघांकडून फसवणुक होत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आंबोली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अमोल कर्पे, शादाब शेख आणि चंद्रशेखर उमाशंकर शुक्ला या तिघांविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांनाही लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे.