शहरात दोन अपघातात ६२ वर्षांच्या वयोवृद्धासह दोघांचा मृत्यू
विलेपार्ले-बोरिवलीतील अपघात; दोन स्वतंत्र एडीआरची नोंद
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ सप्टेंबर २०२४
मुंबई, – शहरात दोन अपघातात एका ६२ वर्षांच्या वयोवृद्धासह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बोरिवली आणि विलेपार्ले परिसरात घडली. याप्रकरणी जुहू आणि बोरिवली पोलिसांनी दोन स्वतंत्र एडीआरची नोंद करुन पळून गेलेल्या एका ट्रकचालकास अटक तर पळून गेलेल्या दुसर्या कारचालकाचा पोलीस शोध घेत आहेत. मृतांमध्ये असद फुंदन खान (६२) आणि अमरदिप राजेंद्र कुमार (२५) यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पहिला अपघात मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता विलेपार्ले येथील एम. व्ही रोड जंक्शन सिग्नलजवळ झाला. असद खान हे सांताक्रुज येथील जुहू रोड, क्रिस्टल अपार्टमेंटमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. मंगळवारी ते त्यांच्या ऍक्टिव्हा बाईकवरुन विलेपार्ले येथून जात होते. यावेळी एम. व्ही रोड सिग्नलजवळ त्यांच्या ऍक्टिव्हाला एका ट्रकने मागून धडक दिली. त्यात ते खाली पडले आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अपघाताची नोंद करुन पोलिसांनी ट्रकचालक इंद्रमनी बाबूराम वर्मा याला अटक केली.
दुसर्या अपघातात अमरदिप राजेंद्र कुमार या २५ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. अमरदिप हा कांदिवलीतील हिंदुस्तान नाका, भाटीया कंपाऊंड परिसरात राहत असून इलेक्ट्रीशियन म्हणून काम करतो. शनिवारी दुपारी दोन वाजता तो मद्यप्राशन करुन रस्ता क्रॉस करत होता. यावेळी बोरिवलीतील बाभई नाकाजवळ दुपारी दोन वाजता त्याला भरवेगात जाणार्या कारने धडक दिली. जखमी झालेल्या अमरदिपला कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान रविवार १५ सप्टेंबरला दुपारी पावणेतीन वाजता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी आरोपी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर कारचालक पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने या कारचालकाचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सागितले.