लैगिंक अत्याचार करणार्या प्रियकराला पोलिसांच्या स्वाधीन केले
लग्नाच्या आमिषाने सलग दोन वर्ष लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० सप्टेंबर २०२४
मुंबई, – लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दोन वर्षांपासून लैगिंक अत्याचार करुन फसवणुक करणार्या आरोपी प्रियकराला प्रेयसीनेच पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केल्याचा प्रकार व्ही. पी रोड पोलीस ठाण्यात घडला. याप्रकरणी या तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रियकराविरुद्ध विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपी प्रियकराला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
१८ वर्षांची तक्रारदार तरुणी ही गोलदेऊळ परिसरात राहते. सोळा वर्षांची असताना तिची इरफान नावाच्या एका तरुणासोबत ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. याच दरम्यान इरफानने तिला प्रपोज करुन लग्नाची मागणी घातली होती. तिनेही त्याला होकार दिला होता. त्यानंतर इरफान तिला लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करुन तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तिनेही त्याला विरोध केला नाही. मे २०२२ ते मे २०२४ या कालावधीत त्यांच्यात अनेकदा संमतीने शारीरिक संबंध आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून लग्नाचा विषय काढल्यानंतर इरफान तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता. तिच्याशी असलेले संबंध तोडण्याची भाषा करत होता. लग्नाच्या आमिषाने त्याने तिच्यावर दोन वर्ष लैगिंक अत्याचार करुन तिची फसवणुक केली होती. त्यामुळे बुधवारी ती इरफानसोबत व्ही. पी रोड पोलीस ठाण्यात आली होती. यावेळी तिने तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून इरफानविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ३५४, ३५४ (बी), ३७६, ३७६ (२), (एन), (जे), (के) भादवी सहकलम ४, ६, ८, १०, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
वडाळा येथे प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
अशाच अन्य एका प्रकरणात जयेश नावाच्या प्रियकराविरुद्ध वडाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ३८ वर्षांची तक्रारदार महिला ही वडाळा येथे राहत असून जयेश हा तिचा प्रियकर आहे. त्याने तिला लग्नासाठी प्रपोज करुन तिच्यावर सलग सात वर्ष लैगिंक अत्याचार केला होता. मात्र तिच्याशी लग्न करण्यास नकार देत तिला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. शारीरिक संबंधासाठी वापर करुन तिची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने जयेशविरुद्ध वडाळा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ३७६ (२), (एन), ४२०, ५०४, ५०६ भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून पळून गेलेल्या जयेशचा पोलीस शोध घेत आहेत.