आजीला भेटायला जायचे आहे सांगून चार वर्षांच्या मुलाचे अपहरण
उत्तरप्रदेशच्या प्रयागराज रेल्वे स्थानकातून नातेवाईक आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – आजीला भेटायला जायचे आहे असे सांगून एका चार वर्षांच्या अल्पवयीन मुलाचे त्याच्याच नातेवाईकाने अपहरण केल्याची घटना कुर्ला परिसरात उघडकीस आली होती. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या लव तुफानी विश्वकर्मा या आरोपी नातेवाईकाला २४ तासांत उत्तरप्रदेशच्या प्रयागराज रेल्वे स्थानकातून स्थानिक रेल्वे पोलिसांच्या मदतीने विनोबा भावे नगर पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्याच्या तावडीतून चार वर्षांच्या अपहरण झालेल्या मुलाची सुखरुप सुटका करुन त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
विजय छेदीप्रसाद विश्वकर्मा हे कुर्ला येथील एमआयजी कॉलनी, भोलेगनर परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. सुतारकाम करणार्या विजय यांना रुद्रांश नावाचा एक चार वर्षांचा मुलगा आहे. २२ फेब्रुवारीला रात्री दहा वाजता रुद्रांश हा घराजवळ खेळत होता. यावेळी त्यांचा नातेवाईक लव विश्वकर्मा तिथे आला. त्याने रुद्रांशला खाऊसह आईस्क्रिम देतो असे सांगून त्याचे अपहरण केले होते. रुद्रांश हा अचानक मिसिंग झाल्याने विजय विश्वकर्मा यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी तसेच स्थानिक रहिवाशांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे त्यांनी विनोबा भावे नगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून रुदांशच्या मिसिंगची तक्रार केली होती. या तक्रारीची पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, सहाय्यक पोलीस आयुक्त गोविंद गंभीरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण यांनी गंभीर दखल घेत अपहरणाचा गुन्हा नोंदवून आरोपीच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमर काळंगे, पोलीस उपनिरीक्षक अमर चेंडे, ओंकार गोडबोले, सोनावणे, मिसिंग पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सावंत, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस शिपाई महाजन, विशे, डोके, राठोड, वराडे यांनी तपासाला सुरुवात केली होती. याकामी या पथकाला अंधेरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आणि मिसिंग व्यक्तींला शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणार्या राजेश पांडे यांची मदत घेतली होती.
परिसरातील पंधरा ते वीस सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यांनतर पोलिसांना लव विश्वकर्मा हा रुद्रांशला घेऊन जात असल्याचे दिसून आले. कुर्ला रेल्वे स्थानकातून तो कल्याण रेल्वे स्थानकात गेला. तेथून तो उत्तरप्रदेशच्या वाराणसी येथे जाणार्या महानगरी एक्सप्रेसने जात असल्याचे दिसून आले. हाच धागा पकडून पोलिसांनी पोलिसांनी महानगरी एक्सप्रेसची करंट स्टेटस काढली असता ती ट्रेन प्रयाजराग रेल्वे स्थानकात येत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर या पथकाने प्रयागराज पोलिसांची मदत घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगून आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अमर चेंडे व त्यांच्या पथकासह प्रयागराज रेल्वे स्थानकाच्या दिशेने रवाना झाले होते. तोपर्यंत रेल्वे पोलिसांनी लव विश्वकर्माला रुदांशसोबत चौकशीसाठी ताब्यात घेतले.
त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता लव हा विजय विश्वकर्माच्या भावाचा मेहुणा आहे. त्यांच्यात क्षुल्लक कौटुंबिक वाद होता. याच वादातून त्याने रुद्रांशचे अपहरण केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. रुद्रांश हा लवला ओळखत होता. त्यामुळे त्याने त्याला आजीला भेटायला जायचे आहे असे सांगून खाऊ आणि आईस्क्रिमचे आमिष दखवून अपहरण केले होते. त्याच्या तावडीतून पोलिसांनी रुद्रांशची सुटका करुन त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. अपरहणाच्या याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण यांनी सांगितले.