मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ सप्टेंबर २०२४
मुंबई, – सांगलीतील खानापूरच्या पारे गावातील मूकबधीर विद्यालयात नोकरीच्या आमिषाने एका कापड व्यापासह त्याच्या मुलाची सुमारे पंधरा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका पिता-पूत्राविरुद्ध मरिनड्राईव्ह पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अजीत उद्धव सूर्यवंशी आणि हर्षवर्धन अजीत सूर्यवंशी अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे सांगलीच्या खानापूरचे रहिवाशी आहेत. याच गुन्ह्यांत त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
रमेश शिवराम डिसले हे कापड व्यापार असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत बदलापूर येथे राहतात. त्यांचे आकाशवाणी, आमदार निवासाच्या गाळ्यामध्ये पुढारी वस्त्र भंडार नावाचे कपड्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानातून मंत्रालयात कामासाठी येणारे अनेक लोक कपडे खरेदी करतात. त्यातून त्यांची अजीत सूर्यवंशीशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. यावेळी अजयने त्यांना त्यांच्या पारे गावात मूकबधीर विद्यालय असून त्यांच्या मुलाला तिथे नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने त्यांना त्यांच्या गावी येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे ऑक्टोंबर २०२३ रोजी रमेश डिसले हे त्यांची पत्नी कांता आणि मुलगा अक्षय यांच्यासोबत पारे गावात गेले होते. यावेळी त्यांनी त्यांना गावातील मूकबधीर विद्यालय दाखविले होते. या विद्यालयात नोकरी करण्याची अक्षयने तयारी दर्शविली होती. यावेळी अजीतने अक्षयला मूकबधीर शाळेसाठी लागणारे विशेष शिक्षण घेतले नसल्याचे सांगून त्याला त्याच्या शिक्षणानुसार काळजीवाहक पद देतो असे सांगितले होते. त्यासाठी त्याने काही आगाऊ रक्कम भरावे लागेल. ही रक्कम दिल्यानंतर त्याला नोकरीवर ठेवता येईल असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी अजीतसह त्याचा मुलगा हर्षवर्धन सूर्यवंशी यांना धनादेशाद्वारे पाच लाख रुपये सिक्युरिटी म्हणून दिले होते.
ही रक्कम दिल्यानंतर अक्षय हा विद्यालयात रुजू झाला होता. विटा येथे भाड्याने रुम घेऊन नियमित कामावर जात होता. जानेवारी २०२४ रोजी अजीत हा त्यांच्या दुकानात आला होता. त्याने त्यांच्याकडे नोकरीसाठी वीस लाखांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला दहा लाख रुपये कॅश स्वरुपात दिल होते. उर्वरित रक्कम राज्य शासनाची ऑर्डर कॉपी दिल्यानंतर देण्याचे मान्य केले होते. मात्र त्यांनी नोकरीची ऑर्डर कॉपी दिली नाही. जुलै २०२४ रोजी अक्षयला अचानक कामावरुन काढून टाकण्यात आले होते. याबाबत त्याने अजीत आणि हर्षवर्धनकडे विचारणा केली असात त्यांनी त्याला तुधी काम करण्याची लायकी नाही अशी अपमानास्पद वागणुक देऊन त्याला तेथून हाकलून दिले होते. २५ लाख रुपये घेऊन आल्यानंतर तुला कामावर ठेवतो असे सांगितले. त्यामुळे अक्षय हा घरी आला आणि त्याने घडलेला त्याच्या वडिलांना सांगितला. त्यामुळे रमेश डिसले यांनी या दोघांना कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. या प्रकाराने त्याला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे नोकरीसाठी दिलेल्या पंधरा लाखांची मागणी सुरु केली होती. मात्र या दोघांनी त्यांना पैसे परत केले नाही.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच रमेश डिसले यांनी मरिनड्राईव्ह पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी पिता-पूत्राविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अजीत सूर्यवंशी आणि हर्षवर्धन सूर्यवंशी या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपी पिता-पूत्रांना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे.