कर्जासह सोने देण्याची बतावणी करुन ३२ लाखांची फसवणुक

पुण्याच्या व्यावसायिकाला गंडा घालणार्‍या तिघांविरुद्ध गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ सप्टेंबर २०२४
मुंबई, – कर्जासह सोने देण्याची बतावणी करुन पुण्यातील एका व्यावसायिकाची सुमारे ३२ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध मरिनड्राईव्ह पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कल्याण सारगुडे, विजयकुमार आणि रफिक भाटिया अशी या तिघांची नावे असून पळून गेलेल्या या तिन्ही आरोपींचा पोलिसांचा शोध सुरु आहे.

सोमनाथ तानाजी केदारी हे पुण्याच्या मुळशी, नेरेचे रहिवाशी असून त्यांचा स्वतचा शेतीचा व्यवसाय आहे. तसेच त्यांची किराणा मालाचे एक आणि पिठाची गिरणी आहे. गावी त्यांच्या मालकीचे बारा रुम असून ते सर्व रुम त्यांनी भाड्याने दिले आहेत. कल्याण हा मेस्त्रीचे काम करत असून मे महिन्यांत त्यांची सागरसोबत ओळख झाली होती. त्यांना गावी नवीन घर बांधायचे होते. त्यासाठी त्यांना कर्जाची आवश्यकता होती. यावेळी सागरने त्याचा मित्र विजयकुमार हा कर्ज देण्याचे काम करतो. तो तुम्हाला कर्ज काढून देईल असे सांगून त्याचा मोबाईल क्रमांक दिला होता. त्यानंतर त्यांनी विजयकुमारला संपर्क साधला होता. यावेळी त्याने त्यांना एक कोटीचे कर्ज देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यासाठी त्याने त्यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना कर्ज मिळवून दिले नाही. याच दरम्यान सागरच्या सांगण्यावरुन त्यांनी रफिकला संपर्क साधला होता. त्याने त्यांना २५ लाखांचे कर्ज देतो असे सांगून त्यांच्याकडून आठ लाख रुपये घेतले. या मोबदल्यात त्याने त्यांना २५ कर्जासह आठ लाखांचे सोन्याचे दागिने देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी रफिकला आठ लाख रुपये दिले होते. ही रक्कम दिल्यानंतर त्यांना विजयकुमार आणि रफिकने मरिनड्राईव्ह येथील ओबेरॉय हॉटेलजवळ बोलाविले होते. तिथे त्यांनी त्याला २५ लाखांचा कर्जाचा धनादेशासह आठ लाखांचे दागिने कबुल केले होते. ठरल्याप्रमाणे २० सप्टेंबरला सोमनाथ केदारी हे त्यांच्या मित्रासोबत मुंबईत आले होते.

मात्र बराच वेळ पाहून ते दोघेही तिथे आले नाही. सागरच्या सांगण्यावरुन सोमनाथ केदारी यांनी कर्जासह सोन्यासाठी रफिक आणि विजयकुमारला ३२ लाख रुपये दिले होते. मात्र त्यांनी कर्जाचा धनादेशासह सोने न देता त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी मरिनड्राईव्ह पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सागर सारगुडे, विजयकुमार आणि रफिक भाटिया या तिघांविरुद्ध पोलिसांनी ३१८ (४), ३ (५) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या तिघांनी अशाच प्रकारे इतर काही फसवणुकीचे गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page