स्ट्रॉक ट्रेडिंगद्वारे नौसेनेच्या अधिकार्याची २३ लाखांची फसवणुक
सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्या आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ सप्टेंबर २०२४
मुंबई, – जास्त कमिशनचे आमिष दाखवून स्ट्रॉक ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन एका नौसेनेच्या अधिकार्याची सुमारे २३ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी एका वॉण्टेड आरोपीस दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर ठगांनी अटक केली. ममन रहमान मुन्शी असे या ३२ वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ममन मुन्शीने फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचे तपासात उघडकीस आले.
दिनेशकुमार कैवरसिंग यादव हे भारतीय नौसेनेत अधिकारी पदावर काम करतात. सध्या ते रायगडच्या उरण, नेवल स्टेशन करंजा, झेलम नेव्हीनगर परिसरात राहतात. २४ मे ते ३० जुलै २०२४ या कालावधीत अविनाश शर्मा, करण मोदी, अक्षता नाव सांगणार्या व्यक्तीने तक्रारदारांना संपर्क साधून ते युबीएस सिक्युरिटीज कंपनीत काम करत असल्याचे सांगितले होते. त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांचा मोबाईल एका व्हॉटअप ग्रुपमध्ये सामिल केले होते. या गु्रपमध्ये स्टॉक ट्रेडिंगबाबत नियमित माहिती दिली जात होती. काही दिवसांनी त्यांनाही स्ट्रॉक ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन आरोपींनी त्यांना एक लिंक पाठवून बोगस ऍपद्वारे गुंतवणुक करण्यास सांगितले. त्यावरील बोगस नफा दाखवून त्यांनीही विविध स्ट्रॉक ट्रेडिंगमध्ये २२ लाख ९१ हजार ८४९ रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना कुठलाही परतावा न देता या तिघांनी त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच दिनेशकुमार यादव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर सायबर सेल पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध ३१८ (४), ३१९ (२), ३३६ (२), (३), ३४० (२), ६१ (१) भारतीय न्याय सहिता सहकलम ६६ (क), ६६ (डी) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या पथकाने तपास सुरु केला होता.
तपासात दिनेशकुमार यादव यांची दहा लाखांची रक्कम एका खाजगी बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. पुढे त्यातील पाच लाख रुपये दुसर्या बँक खात्यात वळविण्यात आले होते. ते बॅक खाते शोएब ऍलेक्स ऍन्थोनी या नावाने उघडण्यात आले होते. त्याने ते खाते विकास आणि सुनिल नावाच्या दोघांना वापरण्यास दिले होते. त्यानंतर या पथकाने विकास संतोषकुमार दुबे आणि सुनिल लक्ष्मीनारायण कुमावत या दोघांना ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनी ते बँक खाते ममन मुन्शी याच्या सांगण्यावरुन उघडल्याचे उघडकीस आले. तोच संबंधित बँक खात्याचा संपूर्ण व्यवहार पाहत होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर या पथकाने सांताक्रुज येथून ममन मुन्शी याला ताब्यात घेतले. फसवणुकीच्या या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती.
ममन मुन्शी हा सांताक्रुजच्या जुहूतारा रोड, इंदिरानगरचा रहिवाशी आहे. त्याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून त्यात विविध बँक खात्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याने फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाते दिल्याचे तसेच या बँक खात्यात लाखो रुपयांचा व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. याकामी त्याला काही रक्कम कमिशन म्हणून मिळाली होती. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.