बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील लगट करुन विनयभंग
२९ हून गुन्ह्यांची नोंद असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ सप्टेंबर २०२४
मुंबई, – दूध आणण्यासाठी गेलेल्या एका बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील लगट करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी संजय सुकम या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला दिडोंशी पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. संजय हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात २९ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
३५ वर्षांची तक्रारदार महिला ही मालाड येथे राहत असून तिला बारा वर्षांची मुलगी आहे. शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता ही मुलगी दूध आणण्यासाठी दुकानात आली होती. यावेळी शिवसेना शाखेजवळील दफ्तरी रोडवर संजयने तिला थांबवून तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तिचा हात पकडून गाल आणि छातीला नकोसा स्पर्श करुन त्याने तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार रस्त्यावरुन जाणार्या एका महिलेने पाहिला होता. त्यामुळे तिने तक्रारदार महिलेला हा प्रकार सांगून संजयविरुद्ध तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर घरी आलेल्या मुलीची चौकशी केल्यानंतर तिनेही संजयने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याचे सांगितले. या घटनेनंतर तिने दिडोंशी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संजयविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची तिथे उपस्थित पोलिसांनी गंभीर दखल घेत त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच संजय हा पळून गेला होता. अखेर शनिवारी रात्री उशिरा त्याला मालाड येथून पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. संजय हा अभिलेखावरील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून मालाड परिसरात राहतो. परिसरात त्याची प्रचंड दहशत आहे. त्याच्याविरुद्ध दिडोंशी पोलीस ठाण्यात चोरी, जबरी चोरी, घरफोडी, अपहरणासह लैगिंक अत्याचार खंडणीसाठी धमकी देणे, मारामारीसह गंभीर दुखापतीच्या २९ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध तडीपार तसेच चॅप्टर केसची कारवाई करण्यात आली होती.