मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ सप्टेंबर २०२४
मुंबई, – गोवंडीतील देवनार परिसरात राहणार्या एका अडीच वर्षांच्या मुलाच्या अपहरणकर्त्यांचा पर्दाफाश करण्यात अवघ्या सहा तासांत देवनार पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी मुंब्रा येथून कॅबचालक असलेल्या अपहरणकर्त्याला पोलिसांनी अटक केली असून नवी मुंबईतून या मुलाची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. त्याला त्याच्या तक्रारदार आईच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तक्रारदार महिला आणि आरोपी एकमेकांच्या परिचित असून त्यांच्यातील प्रेमसंबधातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तक्रारदार महिला गोवंडीतील देवनार परिसरात राहत असून तिला अडीच वर्षांचा एक मुलगा आहे. सोमवारी तिच्या अडीच वर्षांच्या एका अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. हा प्रकार निदर्शनास येताच तिने देवनार पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल होताच देवनार पोलिसांनी दोन पथकाची नियुक्ती करुन या मुलासह अपहरणकर्त्यांचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना अवघ्या सहा तासांत अब्दुल नावाच्या आरोपीस मुंब्रा येथून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच या मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या माहितीवरुन या मुलाची नवी मुंबईतील नवीन पनवेल येथून सुखरुप सुटका करण्यात आली. आरोपी कॅबचालक असून त्याचे मुलाच्या आईसोबत प्रेमसंबंध होते. तिने त्याच्याशी असलेले प्रेमसंंबंध तोडून टाकले होते. त्यातून रागाच्या भरात त्याने तिच्या मुलाचे अपहरण केल्याचे बोलले जाते. अपहरणाच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर अब्दुलला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील, पोलीस उपायुक्त हेमराजसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय डहाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासित सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल घोसाळकर, पोलीस उपनिरीक्षक देशमुख, साळुंखे, सहाय्यक फौजदार कांबळे, पोली शिपाई देशमुख, महिला पोलीस शिपाई फापाळे यांनी केली.
दहा महिन्यांच्या मुलीची सुटका; दोन मित्रांसह त्रिकुटास अटक
दुसर्या घटनेत शेवटची लोकल सुटल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात आईसोबत झोपलेल्या एका दहा महिन्यांच्या मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल होताच अवघ्या पाच तासांत दोन महिलांसह तिघांना सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी पायधुनी येथून अटक केली. रुबीनाबिबी कुतूबशेर शेख, अरबाज सुबेदार शाह आणि लाजिमा हसीबुल खातून अशी या तिघांची नावे आहेत.
गोवंडी येथे राहणारी सुफिया ही तिच्या तीन वर्षांचा मुलगा आणि दहा महिन्यांची मुलीसोबत सोमवारी भायखळा येथील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये आली होती. तिच्या दोन्ही मुलांना डेंग्यू झाला होता. हॉस्पिटलमधून ती भायखळा येथून सीएसएमटी रेल्वे स्थानकात आली होती. तिथेच तिने तिच्या पतीला बोलाविले होते. मात्र या दोघांची भेट झाली होती. त्यातच शेवटची लोकल गेल्याने ती तिच्या दोन मुलांसोबत रेल्वे स्थानकात झोपली होती. रात्री उशिरा तिच्या मुलीचे काही अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. हा प्रकार लक्षात येताच तिने रेल्वे पोलिसांना ही माहिती दिली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून मुलीचा शोध सुरु केला होता. पोलीस उपायुक्त मनोज पाटील, सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असरुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ, महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती मदकुटे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन सांगळे, संदीप गायकवाड, दिपक शिंदे, महिला फौजदार भक्ती घाटगे, पोलीस हवालदार विलास काकड, महिला पोलीस हवालदार मंजुळा माळवी, पोलीस नाईक श्रीकांत इंगवले, जयवंत वाकडे, किरण खेताडे, चंद्रकांत कोळी, तुषार पिसाळ, संतोष कुलाळ, आसद बागसिराज, रावसाहेब पाटील, भैय्या जगताप, सचिन दिवेकर, अमोल चौधरी आणि किशोर सूर्यवंशी यांनी तपासाला सुरुवात केली होती. रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी पायधुनी येथून दोन्ही महिलांसह तिघांना अटक केली. ते तिघेही कोलकाता आणि झारखंडचे रहिवाशी आहेत. रुबीना आणि अरबाज मजुरी तर लाजिमा ही भीक मागण्याचे काम करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.