मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ सप्टेंबर २०२४
मुंबई, – रियल इस्टेट व्यावसायिक असलेल्या एका महिलेच्या घरी तिच्याच नोकराने सुमारे नऊ लाखांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी टुनटुन पासवान या नोकराविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. टुनटुन हा मूळचा झारखंडचा रहिवाशी असून तो गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून तक्रारदार व्यावसायिक महिलेकडे नोकरी करत होता.
४४ वर्षांची तक्रारदार महिला अर्चना रामवतार सिंग हिचा रियल इस्टेटचा व्यवसाय असून ती अंधेरतील लोखंडवाला सर्कल परिसरात राहते. मार्च २०२४ रोजी तिने टुनटुन पासवान याला पूर्ण वेळेसाठी तिच्या घरी कामावर ठेवले होते. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून तो तिच्याच घरी राहत होता. १४ सप्टेंबरला ती तिच्या एका नातेवाईकांच्या कार्यक्रमाला आग्रा येथे गेली होती. त्यापूर्वी तिने कपाटातील लाकडी ड्राव्हरमधील काही दागिन्यांची पाहणी केली होती. त्यात तिला सुमारे नऊ लाखांचे दागिने सापडले नाही. मात्र कार्यक्रमाला जाण्याची घाई असल्याने तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. दोन दिवसांनी ती मुंबईत परत आली होती. यावेळी तिने तिच्या मुलाला दागिन्याविषयी विचारणा केली होती. त्याने दागिन्याबाबत त्याला काही माहित नसल्याचे सांगितले. या दोघांनी संपूर्ण घराची पाहणी केली असता त्यांना तिचे नऊ लाखांचे दागिने कुठेच सापडले नाही. याच दरम्यान त्याने त्याला ट्यूमर झाले असून त्याला उपचारासाठी गावी जावे लागेल असे सांगितले होते. त्यामुळे तिने त्याला तिच्या फॅमिली डॉक्टरकडे नेले होते, यावेळी डॉक्टरने त्याला तपासून त्याला काहीच झाले नसल्याचा रिपोर्ट दिला होता. त्यानंतर टुनटुन हा घरी कोणाला काहीही न सांगता निघून गेला होता. या घटनेनंतर अर्चना सिंगने वर्सोवा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार करुन या चोरीमागे टुनटुन पासवान याचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला होता. या तक्रारीनंतर टुनटुन पासवानविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.