मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ सप्टेंबर २०२४
मुंबई, – ई-सिगारेट विक्रीप्रकरणी पोलीस कारवाईची धमकी देऊन एका अल्पवयीन मुलाकडून खंडणी वसुल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलाच्या आरोपी मित्राविरुद्ध नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या मित्राने मुलाकडून आतापर्यंत ४३ ग्रॅम वजनाचे सोने आणि ऐंशी हजार असा दोन लाख दहा हजार रुपयांची खंडणी वसुली केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
यातील तक्रारदार मुलुंड परिसरात राहत असून त्यांचा स्वतचा इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचे एक शॉप आहे. त्यांचा एक अल्पवयीन मुलगा असून त्याचा फाज नावाचा एक मित्र आहे. जुलै महिन्यांत त्यांच्या मुलाने फाजला ई-सिगारेट दिली होती. ही सिगारेट नंतर त्याच्याकडून परत घेतली होती. मात्र त्यावरुन फाज हा त्याला ब्लॅकमेल करत होता. पोलीस कारवाई करणार असल्याचे सांगून तो त्याच्याकडे पैशांची मागणी करत होता. पैसे दिले तर त्याच्याविरुद्ध कारवाई होणार नाही. नाहीतर त्याच्यावर अटकेची कारवाई होईल अशी भीती घालत होता. या भीतीपोटी त्याने घरातून ४३ ग्रॅम वजनाचे दागिन्यासह ऐंशी हजार रुपयांची कॅश चोरी करुन फाजला दिले होते. हा प्रकार अलीकडेच त्याचे तक्रारदार वडिलांना समजला होता.त्यानंतर त्यांनी नवघर पोलिसांना हा प्रकार सांगून फाजविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी धमकी देणे, अल्पवयीन न्याय अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत अद्याप फाजला पोलिसांनी अटक केली नाही. त्याची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.