मध्यप्रदेशातून आणलेल्या घातक शस्त्रांसह दोघांना अटक
दोन देशी पिस्तूल, चार काडतुसे, दोन मोबाईल हस्तगत
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – मध्यप्रदेशातून आणलेल्या घातक शस्त्रांसह दोघांना शुक्रवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पवई येथून अटक केली. सचिनकुमार फुलचंद कुशवाह आणि अमरकुमार बादशाह नाई अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मध्यप्रदेशातील रहिवाशी आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी देशी बनावटीचे दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, मोबाईल आदी मुद्देमाल जप्त केला आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्यांना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून घातक शस्त्रे आणून त्याच्या विक्रीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. या शस्त्रांचा नंतर रॉबरी, घरफोडीसह इतर गंभीर गुन्ह्यांत वापर होत असल्याने अशा आरोपीविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच पवईतील फिल्टरपाडा ते रॉयल पामच्या दिशेने जाणार्या रस्त्यावर काहीजण घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट दहाच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक सावंत यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नार्वेकर, तोडकर, चौधरी, पोलीस हवालदार अमीत जगताप, पोलीस शिपाई डफळे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. रात्री उशिरा तिथे दोन तरुण आले होते, या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडील बॅगेची तपासणी केल्यानंतर पोलिसांना त्यात दोन देशी बनावटीचे पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, दोन मोबाईल सापडले. या शस्त्रांविषयी विचारणा केल्यानंतर त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यानंतर या दोघांविरुद्ध पवई पोलीस ठाण्यात घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून त्यांचा ताबा गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता.
अटकेनंतर त्यांना शनिवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीत सचिनकुमार आणि अमरकुमार हे दोघेही मध्यप्रदेशातील मुरवारा, माधवनगरचे रहिवाशी असून सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. या दोघांनी ते शस्त्रे कोणाकडून घेतले होते, मुंबईत ते दोघेही शस्त्रांची विक्रीसाठी आले होते, ते शस्त्रे कोणाला विक्री करणार होते. या गुन्ह्यांत त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत. जप्त केलेल्या शस्त्रांचा कुठल्या गुन्ह्यांत वापर झाला आहे का, या दोघांनी यापूर्वीही घातक शस्त्रांची विक्री केली आहे का, त्यांच्या कुठल्या संघटित टोळीशी संबंध आहे का याचा आता पोलीस तपास करत आहे.