समुपदेशामुळे तीन शिक्षक बंधूंना खावी लागली कोठडीची हवा
सोळा वर्षांच्या मुलीवर क्लासेसमध्ये तिन्ही बंधूंकडून अत्याचार
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ सप्टेंबर २०२४
मुंबई, – गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना भुलेश्वर परिसरात उघडकीस आली आहे. पालकांनी मुलीला शिक्षणासाठी भरोशावर ज्या शिक्षकाकडे पाठविले होते, तेच शिक्षक हैवान झाले. मुलीला अश्लील चित्रपट दाखवून तिच्यावर या शिक्षक बंधूने अश्लील चाळे करुन तिचा विनयभंगासह लैगिंक अत्याचार केला. याप्रकरणी एल. टी मार्ग पोलीस ठाण्यात विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच तिन्ही शिक्षक बंधूंना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या तिघांनाही विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुबईसारख्या महानगरीत कानाकोपर्यातून विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात. त्यातदेखील खाजगी शिकवणीला जाणार्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. काही दिवसांपूर्वीच धारावी येथे शिक्षकाने विद्यार्थ्याचे लैगिंक शोषण केल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असताना आता भुलेश्वर येथे एका खाजगी क्लासेसच्या संचालक असलेल्या तीन शिक्षक बंधूंनी एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका शिक्षिकेने मुलीचे समुपदेशन केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
२९ वर्षांची तक्रारदार महिला ग्रँटरोड येथे राहत असून ती विविध शाळा आणि खाजगी क्लासेसमधील विद्यार्थ्याचे समपुदेशन करण्याचे काम करते. विद्यार्थ्यांना विशेषता मुलींना बॅड आणि गुड टचविषयी माहिती सांगून त्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या असतील तर त्यांची माहिती काढते. २७ सप्टेंबरला तिने सोळा वर्षांच्या मुलीचे समुपदेशन केले होते. यावेळी तिने दिलेली माहिती ऐकून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. ही मुलगी नववीत असताना भुलेश्वर येथील एका खाजगी क्लासेसमध्ये जात होती. याच क्लासेसमध्ये सत्यराज, तरुण आणि गौतम हे तिघेही बंधू शिक्षक तसेच संचालक म्हणून काम करतात. २०२२ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत तरुणने तिला क्लासमध्ये थांबवून तिला मिठी मारुन तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. त्यानंतर तरुणचा मोठा भाऊ सत्यराजने जुलै ते डिसेंबर २०२३ या कालावधीत तिच्यासोबत क्लासमध्येच ओरल सेक्ससह तिच्याशी जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. या कालावधीत त्याने तिच्यावर दोन वेळा लैगिंक अत्याचार केल्याचे पिडीत मुलीने सांगितले.
या दोन बंधूनंतर त्यांचा तिसरा भाऊ गौतम याने तिला मूव्ही पाहण्यासाठी नेले होते. ती अल्पवयीन असल्याची माहिती असताना त्याने तिला अडल्ट रेटेड मूव्ही दाखवून तिच्याशी सिनेमा पाहताना अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार मुलीकडून समजताच या महिलेने ना. म जोशी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी तिन्ही बंधूंविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत तिन्ही बंधूंविरुद्ध विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा भुलेश्वर येथे घडल्याने त्याचा पुढील तपास एल. टी मार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच या तिन्ही बंधूंना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित खाजगी क्लासेसच्या इतर शिक्षकासह विद्यार्थी आणि पालक वर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान तिन्ही शिक्षक बंधूंना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या शिक्षकांनी अशाच प्रकारे इतर काही विद्यार्थिनींवर अत्याचार केला आहे का याचा तपास सुरु आहे.