२.१७ कोटीच्या फसवणुकीप्रकरणी महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा

शेअर गुंतवणुकीसाठी दिलेल्या पैशांतून रेंज रोवर कार खरेदी केली

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ सप्टेंबर २०२४
मुंबई, – शेअर गुंतवणुकीसाठी घेतलेल्या दोन कोटी सतरा लाखांचा अपहार करुन एका व्यावसायिकाची फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तक्रारदार व्यावसायिकाची मैत्रिण अरिबा व तिचा विवाहीत प्रियकर केतन पारिख यांच्याविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. पैशांची मागणी करुन वकिलामार्फत नोटीस पाठविली म्हणून या महिलेने तक्रारदाराविरुद्ध वर्सोवा पोलिसांत लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यांत त्यांना विशेष सेशन कोर्टाने अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे.

संजय मुलचंद भागचंदानी हे अंधेरीतील डी. एन नगर परिसरात राहत असून व्यवसायाने व्यावसायिक आहेत. गेल्या आठ वर्षांपासून ते अरिबाला ओळखत असून तिच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. खार येथील एका हॉटेलमध्ये ओळख झाल्यानंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. मोबाईलसह सोशल मिडीयावरुन ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. त्यावेळेस संजय भागचंदानी हे सुरत शहरात राहत होते. मात्र अरिबाला भेटण्यासाठी ते अधूनमधून मुंबईत येत होते. पाच वर्षांपूर्वी ते दोघेही एका हॉटेलमध्ये जवळपास एक वर्ष एकत्र वास्तव्यास होते. चार वर्षांने तिने त्यांची केतन पारिखसोबत ओळख करुन दिली होती. केतन हा शेअर ऑपरेटर असून तो काही खाजगी कंपन्यांसाठी शेअरचे काम करत असल्याचे तिने त्यांना सांगितले होते. यावेळी केतनने त्यांना शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. केतन हा अरिबाचा खास मित्र असल्याने त्यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवून शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.

मे २०२१ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत त्यांनी या दोघांनाही शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी दोन कोटी सतरा लाख रुपये दिले होते. या गुंतवणुकीनंतर ते अरिबा आणि केतन यांच्याकडे सतत शेअरसंदर्भात माहिती घेत होते. यावेळी अरिबाने त्यांना चार धनादेश दिले होते. त्यावर तिची स्वाक्षरी होती. काही दिवसानंतर त्यांनी या दोघांकडून शेअर गुंतवणुकीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते दोघेही माहिती देण्यास टाळाटाळ करत होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे शेअर गुंतवणुकीसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी त्यांना पैसे परत केले नाही. याच दरम्यान त्यांना अरिबा आणि केतन यांच्यात प्रेमसंंबध असून त्यांनी संगनमत करुन त्यांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. मात्र त्यांनी गुंतवणुकीसाठी दिलेल्या २ कोटी १७ लाख ८५ हजार रुपयांचे शेअर खरेदी केले नव्हते. याच पैशांतून त्यांनी नवीन रेंज रोवर कार खरेदी करुन त्यांच्या पैशांचा अपहार केला होता.

हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत अरिबा आणि केतन यांना नोटीस पाठविली होती. त्याचा राग आल्याने अरिबाने त्यांच्याविरुद्ध वर्सोवा पोलीस ठाण्यात लैगिंक अत्याचाराची तक्रार केली होती. तिची जबानी नोंदवून पोलिसांनी एप्रिल २०२४ रोजी संजय भागचंदानी यांच्याविरुद्ध लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्यांना दिडोंशी सेशन कोर्टाने अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. शेअर गुंतवणुकीसाठी घेतलेल्या पैशांचा या दोघांनी अपहार करुन शेअर खरेदी न करता त्यांच्या पैशातून नवीन रेंज रोवर कार खरेदी करुन फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अरिबासह केतन पारिख या दोघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा वर्सोवा पोलिसाकडून तपास सुरु आहे. या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page