मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – तेरा लाखांच्या हिर्यांच्या अपहारप्रकरणी विरल अशोकभाई शाह या दलालाविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. क्रेडिटवर घेतलेल्या हिर्यांची विक्री न करता हिर्यांचा अपहार केल्याचा विरलवर आरोप आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शैलेश वाडीलाल वोरा हे हिरे व्यापारी असून ते मलबार हिल येथे राहतात. त्यांचा वांद्रे येथील भारत डायमंड बोर्स येथे मौली इम्पेक्स नावाचे हिरे खरेदी-विक्रीचे एक कार्यालय आहे. याच व्यवसायानिमित्त त्यांची विरल शाहशी ओळख झाली होती. तो हिर्यांचा हिर्यांच्या दलालीचे काम करत असून त्यांनी त्याच्यासोबत यापूर्वीही हिरे खरेदी-विक्रीचा व्यवहार केला होता. त्यामुळे त्याच्यावर त्यांचा विश्वास होता. १७ फेब्रुवारीला विरलने आशिषभाई या हिरे व्यापार्यासाठी त्यांच्याकडून क्रेडिटवर तेरा लाख रुपयांचे हिरे घेतले होते. मात्र आशिषभाई यांना हिर्यांची विक्री न करता त्याने हिर्यांचा अपहार करुन फसवणुक केली होती. त्यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. तो मोबाईल बंद करुन पळून गेला होता.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बीकेसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून विरल शाहविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी तेरा लाखांचा हिर्यांचा अपहार करुन शैलेश वोरा यांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. पळून गेलेल्या विरलचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही हिरे व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.