वरळी दूध डेअरीच्या मुख्य लिपीकास लाच घेताना अटक

मानधन काढण्यासाठी पाच हजाराची लाचेची मागणी केली

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ सप्टेंबर २०२४
मुंबई, – वरळी दूध डेअरीच्या मुख्य लिपीक महेश पुंडलिक सपकाळे यांना लाच घेताना मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाचे मानधन काढण्यासाठी पाच हजाराची लाचेची मागणी केल्याचा महेश सपकाळे यांच्यावर आरोप आहे. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टाने मंगळवार १ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

२९ वर्षीय तक्रारदार मुंबई महानगरपालिकेच्या एफ/दक्षिण विभागात कनिष्ठ लेखा परिक्षक आणि लेखा सहाय्यक म्हणून कामाला आहे. लोकसभा निवडणुक २०२४ साठी त्यांना २८ मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा अंतर्गत १६९ घाटकोपर पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात एक खिडकी योजनेसाठी अतिरिक्त काम सोपविण्यात आले होते. या कामाचा मोबदला म्हणून शासनाकडून त्यांना त्यांच्या पगाराचे बेसिक एवढे मानधन मिळणार होते. ते मानधन मिळावे यासाठी त्यांनी मुख्य लिपीक महेश सपकाळे यांच्या कार्यालयात अर्ज केला होता. ते मानधन काढण्यासाठी महेश सपकाळे याने त्यांच्याकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच दिल्याशिवाय त्याच्याकडून मानधन काढले जाणार नाही याची खात्री होताच त्यांनी त्याला पाच हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यानंतर २० सप्टेंबरला त्यांनी त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.

या तक्रारीची २७ सप्टेंबरला शहानिशा करण्यात आली होती. त्यात महेश सपकाळे यांनी तक्रारदाराकडे पाच हजाराची लाच मागितली होती. त्यानंतर या पथकाने शुक्रवारी विक्रोळीतील निवडणुक आयोगाचे कार्यालयातील वर्षानगर महानगरपालिका शाळा संकुल परिसरात साध्या वेळात सापळा लावला होता. यावेळी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाचेची रक्कम घेताना महेश सपकाळे यांना या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी भष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला अटक करण्यात आली. रविवारी दुपारी त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page