मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० सप्टेंबर २०२४
मुंबई, – भाड्याच्या कारचा परस्पर विक्री करुन अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालणार्या एका मुख्य आरोपीस मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. आकाश ब्रिजेश सिंह असे या आरोपीचे नाव असून त्याने आतापर्यंत भाड्याने घेतलेल्या २८ हून अधिक बाईक आणि कारची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यापैकी विक्री केलेले २६ वाहने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित दोन वाहने लवकरच जप्त केले जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सत्यजीत इंदर राठोड हा मालाडच्या मालवणीतील चिकूवाडीचे रहिवाशी आहे. त्याचा मोबाईल रिचार्जचा व्यवसाय असून या व्यवसायात त्याला त्याचा भाऊ मदत करतो. १५ ऑगस्टला त्याला आकाशने शूटींगसाठी काही बाईक आणि कार भाड्याने पाहिजे असल्याचे सांगितले होते. ही माहिती त्याने त्याच्या परिचित नितीन तिवारी, अर्जुन लादवा, अभिजीत विश्वकर्मा आणि किरण राठोड यांना सांगितली होती. त्यानंतर त्यांनी त्याच्या विश्वासावर आकाशला शूटींगसाठी बाईक आणि कार असे चार वाहन भाड्याने दिले होते. या वाहनांच्या मोबदल्यात आकाश हा त्यांना दरमाह भाडे देणार होता. मात्र महिना उलटूनही आकाशने भाड्याची रक्कम दिली नाही. त्यामुळे त्याने त्याच्याकडे भाड्याने दिलेले बाईक आणि कार परत करण्यास सांगितले. मात्र या वाहनांचा अपहार करुन तो पळून गेला होता. चौकशीदरम्यान आकाशने अशाच प्रकारे अनेकांकडून भाड्याने कार आणि बाईक घेऊन त्यांना भाडे न देता त्यांच्या वाहनांचा अपहार केल्याचे सत्यजीत राठोडला समजले होते.
हा प्रकार लक्षात येताच त्याने मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आकाशविरुद्ध पोलिसांनी वाहनांचा अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आकाश सिंह याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने अनेकांकडून भाड्याने कार आणि बाईक घेऊन या वाहनांची गोवा, सोलापूर आणि गुजरातमध्ये विक्री केल्याची कबुली दिली. त्याने आतापर्यंत २८ हून अधिक वाहनांची परस्पर विक्री करुन संबंधित व्यक्तींची फसवणुक केली होती. या वाहनचालकाचे मालक विदेशात आहेत, ते विदेशातून आल्यानंतर कार आणि बाईकचे कागदपत्रे देतो असे सांगून तो त्यांच्याकडून पैसे घेऊन पळून जात होता. त्याने विक्री केलेले २६ बाईक आणि कार जप्त करण्यात आले असून उर्वरित दोन वाहनांचा शोध सुरु आहे.