मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० सप्टेंबर २०२४
मुंबई, – अटल सेतूवर एका ४० वर्षांच्या बँक मॅनेजरने समुद्रात उडी घेतल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. सुशांत चक्रवर्ती असे या ४० वर्षांच्या बँक मॅनेजरचे नाव असून कामाच्या अतिरिक्त कामामुळे मानसिक नैराश्यातून त्यांनी ही टोकाची भूमिका घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सायंकाळपर्यंत त्यांचा शोध सुरु होता. मात्र त्यांचा शोध लागला नाही. त्यातच अंधारामुळे सर्च ऑपरेशन थांबविण्यात आले. मंगळवारी पुन्हा सर्च ऑपरेशन सुरु केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुशांत हे परळ येथे त्यांच्या वयोवृद्ध आई, पत्नी आणि सात वर्षांच्या मुलीसोबत राहत होते. ते एका खाजगी बँकेत मॅनेजर म्हणून कामाला असून त्यांची नियुक्ती फोर्ट येथील शाखेत होती. गेल्याच आठवड्यात ते त्यांच्या कुटुंबियंसोबत लोणावळा येथे फिरायला गेले होते. लोणावळा येथून परत मुंबईत आल्यानंतर सोमवारी ते त्यांच्या कारमधून कामाला जाण्यासाठी निघाले. ही कार अटल सेतूवरुन जात असताना त्यांनी अटल सेतूवरील ८.५ किलोमीटर अंतरावर अचानक कार थांबवली. त्यानंतर ते कारमधून बाहेर आले आणि समुद्रात उडी घेतली होती. हा प्रकार समजताच शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती, मात्र सायंकाळपर्यंत त्यांचा शोध लागला नाही. अंधारामुळे ही मोहीम थांबविण्यात आली. कारच्या क्रमाकांवरुन त्यांची ओळख पटली. त्यानंतर ही माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. प्राथमिक तपासात सुशांत हे बॅकेत मॅनेजर म्हणून कामाला होते. त्यांना कामाचा प्रचंड ताण होता. त्यातून त्यांना प्रचंड नैराश्य आले होते. त्यामुळे ते कुटुंबियांसोबत लोणावळा येथे फिरायला गेले होते. मात्र सोमवारी कामावर जाताना त्यांनी अचानक अटल सेतूवरुन समुद्रात उडी घेतली होती. सुशांत चक्रवर्ती यांनी अटल सेतूनवरुन उडी घेतल्याचे वृत्त समजताच त्यांच्या सहकार्यासह नातेवाईक आणि मित्रांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.