सचिवलायात मुख्यमंत्र्याच्या बोगस स्वाक्षरी व शिक्के असलेले निवेदन सापडले

अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून तपास सुरु

0

मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) – सचिवालय कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बोगस स्वाक्षरी आणि शिक्के असलेले काही निवेदन सापडल्याने तिथे उपस्थित अधिकार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. संपूर्ण निवेदनाची शहानिशा केल्यानंतर दहा ते बारा निवेदनावर बोगस स्वाक्षरी आणि शिक्के असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी रात्री उशिरा मरिनड्राईव्ह पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह बोगस दस्तावेज तयार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास ुसरु केला आहे. या गुन्ह्यांचा मरिनड्राईव्ह पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी संमातर तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा तपास लवकरच गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली काही निवेदने आणि पत्र पुढील कारवाईसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयात येतात. या निवेदनांची आधी टपाल शाखेत नोंद करुन नंतर ती ई-ऑफिस प्रणालीत नोंद केली जातात. त्यानंतर ते निवेदन पुढील कारवाईसाठी संबंधित प्रशासकीय विभागांना पाठविण्यात येतात. मात्र गेल्या काही दिवसांत कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बोगस स्वाक्षरी आणि तसेच शिक्के असल्याचे काही दस्तावेज सचिवालयातील अधिकार्‍यांच्या निदर्शनास आले होते. या निवेदनाची पाहणी केल्यानंतर जवळपास दहा ते बारा निवेदनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बोगस स्वाक्षरी आणि शिक्के असल्याचे निष्पन्न झाले होते. हा प्रकार उघडकीस येताच या अधिकार्‍यांनी ती माहिती त्यांच्या वरिष्ठांना दिली होती.

या बोगस निवेदनाची संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत त्याच्या काही झेरॉक्स प्रती काढून मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आदेश या अधिकार्‍यांना दिले होते. त्यानंतर बोगस निवेदनासह अर्जासह या अधिकार्‍यांनी मरिनड्राईव्ह पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४७३ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या तक्रारीची वरिष्ठांनीही गंभीर दखल घेत मरिनड्राईव्ह पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला संमातर तपास करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. प्राथमिक तपासात आतापर्यंत दहा ते बारा बोगस निवेदन पोलिसांना प्राप्त झाले आहेत. आणखीन काही निवेदनावर मुख्यमंत्र्यांची बोगस स्वाक्षरी आणि शिक्के आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page