मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – विशेष सेशन कोर्टात घुसून एका मनोरुग्ण महिलेने सोमवारी सकाळी प्रचंड धिंगाणा घातला. न्यायमूर्तींना शिवीगाळ करुन कोर्टाच्या सामानासह कर्तव्य बजाविणार्या पोलीस शिपाई महिलेचा चावा घेऊन दुसर्या शिपाई महिलेला धक्काबुक्की करुन मारहाणीचा प्रयत्न केला. या घटनेने भरकोर्टात एकच खळबळ उडाली होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करुन या महिलेला ताब्यात घेऊन तिला पुढील उपचारासाठी मनोरुग्णालयात दाखल केले. तिच्याविरुद्ध कुलाबा पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
३४ वर्षांची तक्रारदार महिला पोलीस शिपाई असून सध्या नवी मुंबईतील कळंबोली परिसरात राहतो. तिची नेमणूक सध्या विशेष सेशन कोर्टात आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजता ती विशेष सेशन कोर्ट क्रमांक दहामध्ये कर्तव्य बजावत होती. यावेळी तिथे अफसाना नावाची एक महिला आणि तिने अचानक आरडओरड सुरु केला होता. तिने न्यायमूर्तींना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर तिने स्वतचे कपडे काढून न्यायमूर्तीच्या खुर्चीवर नग्नावस्थेत बसली होती. त्यांच्या न्यायासनावरील काच फोडून न्यायालयाचे उल्लघंन करताना सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार तिथे उपस्थित पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने तक्रारदार महिला शिपायाच्या उजव्या हाताला जोरात चावा घेतला होता. त्यामुळे तिच्या हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर तिने दुसर्या महिला शिपायाला जोरात धक्काबुक्की करुन मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करुन तिला ताब्यात घेऊन कुलाबा पोलीस ठाण्याच्या मोबाईल व्हॅनमध्ये बसविण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने पोलीस व्हॅनच्या टॅबचे ुकसान केले. या घटनेनंतर या महिलेविरुद्ध कुलाबा पोलिसांनी कोर्टासह सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणे, कर्तव्य बजाविणार्या महिला पोलिसांना मारहाण करुन धक्काबुक्की करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
प्राथमिक तपासात ही महिला मनोरुग्ण आहे. तिच्याविरुद्ध गेल्या वर्षी आझाद मैदान पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. याच गुन्ह्यांत ती सध्या जामिनावर होती. सोमवारी ती विशेष सेशन कोर्टात आली होती. यावेळी तक्रारदार शिपाई महिलेने तिला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तिने तिथे प्रचंड गोंधळ घातला होता. ती मनोरुग्ण असल्याने सतत कोर्टात चकरा मारत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तिची मानसिक स्थिती ठिक नसल्याने तिला मनोरुग्णालयात पाठविण्यात आले आहे.