तीन हिरे व्यापार्यांची फसवणुक करणार्या दलालास अटक
विक्रीसाठी दिलेले ८९ लाखांचे हिरे घेऊन पलायन केले होते
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समधील तीन हिरे व्यापार्यांची फसवणुक करणार्या एका दलालास सहा महिन्यानंतर अटक करण्यात बीकेसी पोलिसांना यश आले आहे. रणजीतभाई ऊर्फ राजूभाई रुखदभाई भखलकिया असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. रणजीतभाईने विक्रीसाठी घेतलेल्या सुमारे ८९ लाखांचा अपहार करुन तीन व्यापार्यांची फसवणुक करुन पलायन केल्याचा आरोप आहे. त्याच्याकडून अपहार केलेले हिरे लवकरच जप्त करण्यात येणार आहे.
दक्षिण मुंबईत राहणारे योगेश हिराचंद झवेरी हे हिरे व्यापारी आहेत. त्यांचा हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून त्यांची स्वतची एक कंपनी आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्स अपार्टमेंटमध्ये असून या कार्यालयातून त्यांचे सर्व व्यवहार चालतात. रणजीतभाई हा हिरे दलाल असून गेल्या तीन वर्षांपासून ते त्याच्या परिचित आहेत. तो गुजरातच्या अमरेलीचा रहिवाशी असून त्यांच्याकडून क्रेडिटवर घेतलेल्या हिर्यांची तो गुजरातच्या हिरे व्यापार्यांना विक्री करतो. गेल्या तीन वर्षांत त्याच्यासोबत त्यांनी अनेकदा व्यवहार केला होता. त्यामुळे त्यांचा त्याच्यावर विश्वास होता. २० मार्च २०२३ रोजी तो त्यांच्या कार्यालयात आला होता. त्याच्याकडे हिरे खरेदीसाठी काही ग्राहक असल्याचे सांगून त्याने त्यांच्याकडून २८ लाख ४० हजार रुपयांचे हिरे के्रडिटवर घेतले होते. दुसर्या दिवशी हिरे किंवा हिर्याच्या विक्रीतून आलेली रक्कम परत करण्याचे त्याने आश्वासन दिले होते. मात्र तीन ते चार उलटूनही तो कार्यालयात आला नव्हता. हिरे तसेच हिर्यांच्या विक्रीतून आलेली रक्कम त्याने जमा केली नव्हती. त्यामुळे त्याला त्यांनी कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल बंद होता.
याच दरम्यान त्यांना रणजीतभाईने त्यांच्यासह त्यांचे परिचित हिरे व्यापारी फलक दिलीप शहा यांच्याकडून २० मार्चलाच ३६ लाख रुपयांचे तर भावीनकुमार जसमतभाई कलाथिया यांच्याकडून २५ लाख रुपयांचे हिरे क्रेडिटवर घेतले होते. ८९ लाख ४० हजार रुपयांचे हिरे घेऊन तो पळून गेला होता. त्यांना त्याचा मोबाईल बंद येत असल्याचे निदर्शनास आले होते. विक्रीसाठी घेतलेल्या हिर्यांचा रणजीतभाईने अपहार करुन या तिघांची फसवणुक केल्याचे लक्षात येताच योगेश झवेरी यांनी बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रणजीतभाईविरुद्ध पोलिसांनी हिर्यांच्या अपहारासह फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता.
ही शोधमोहीम सुरु असताना रणजीतभाई याला गुजरात येथून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने या तिन्ही व्यापार्यांकडून घेतलेल्या हिर्याचंा अपहार केल्याची कबुली दिली. या हिर्यांची त्याने परस्पर विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे विक्री केलेले हिरे जप्त करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.