मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या विजय राधेश्याम गौड या २५ वर्षांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराची त्याच्याच मित्राने हत्या केल्याची घटना भांडुप परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद करुन आरोपी मित्र सुरज गायकवाड याला भांडुप पोलिसांनी अटक केली आहे. आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
ही घटना मंगळवारी तीन वाजता भांडुप येथील कोकणनगर किटीकेअर हॉस्पिटलमध्ये घडली. विजय गौड हा भांडुपचा रहिवाशी असून रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध भांडुप पोलीस मारामारी, शिवीगाळ करणे धमकी देणे, अनैसगिक लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी चॅप्टर केस दाखल असून दोन वर्षांपूर्वी त्याला तीन महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते. आरोपी सुरज गायकवाड हा त्याचा मित्र आहे. या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आर्थिक वाद सुरु होता. भांडुपच्या एलबीएस मार्ग, जनता मार्केटमध्ये मंगळवारी या दोघांमध्ये उधारीच्या पैशांवरुन प्रचंड वाद झाला होता. यावेळी विजयने सुरजला मारहाण केली होती. त्यात त्याने सुरजला धक्का दिल्याने तो खाली पडला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. जखमी विजयला तातडीने किटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विशाल मोरे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सुरजविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.