२७ वर्षांच्या तरुणीला प्रियकराकडून खंडणीसाठी धमकी

इतर कोणाशी लग्न करायचे असेल तर पैसे देण्याची मागणी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – मुलुंड येथे राहणार्‍या एका २७ वर्षांच्या तरुणीला तिच्याच प्रियकराने तीन लाखांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुपेश रतन सोनावणे असे या प्रियकराचे नाव असून त्याच्याविरुद्ध मुलुंड पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रुपेशने तक्रारदार तरुणीला तिचे लग्न होऊ देणार नाही असे सांगून तिला इतर कोणाशी लग्न करायचे असेल तर त्याला तीन लाख रुपये द्यावे लागतील अशी धमकी दिली होती. या तक्रारीची मुलुंड पोलिसांनी गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे.

२७ वर्षांची तक्रारदार तरुणी तिच्या कुटुंबियांसोबत मुलुुंड येथे राहत असून ठाण्यातील एका नामांकित वाहनाच्या शोरुममध्ये कामाला आहे. पूर्वी ती मुलुंडच्या हमेदिया मशिदीजवळील एका चाळीत राहत होती. तिथे राहत असताना तिची आठ वर्षापूर्वी रुपेशशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांची मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध आले होते. त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते, मात्र लग्नाविषयी बोलणीसाठी तो तिच्या घरी जात नव्हता. त्यामुळे तिने त्याच्याशी अंतर ठेवण्यास सुरुवात केली होती. काही दिवसांनी तिने त्याच्यापासून संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्याने तिला असेच सोडणार नाही अशी धमकी दिली होती. याच दरम्यान ती एका नामांकित ज्वेलर्स दुकानात सेल्सगर्ल म्हणून कामाला लागली होती. तिथे तिला कामाच्या वेळेस मोबाईल जमा करावा लागत होता. त्यामुळे तिचे त्याच्याशी फोनवरुन बोलणे कमी झाले होते. याच कारणावरुन तो तिचा मानसिक शोषण करत होता. तिच्या कामाच्या ठिकाणी मद्यप्राशन करुन धिंगाणा घालत होता. त्यामुळे तिने ती नोकरी सोडली होती. अनेकदा तिच्या नातेवाईकांसह कुटुंबियांशी बोलताना तिचा फोन बिझी लागत असल्याने तो तिच्यावर संशय घेत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याच्याकडून तिचा सतत मानसिक शोषण सुरु होता. त्यामुळे तिने त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडून त्याला तू तुझ्या मार्गाने जा असे स्पष्टपणे सांगितले होते. तरीही तो तिच्या नवीन कामाच्या ठिकाणी तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत होता.

गेल्या महिन्यांत त्याने तिला कॉल केला होता. यावेळी त्याने तिला त्याच्याशिवाय अन्य कोणाशी लग्न करायचे आहे तर तो तिचे लग्न कधीच होऊ देणार नाही, तिचे लग्न मोडण्याची त्याने तिला धमकी दिली होती. तसेच तिला जर दुसर्‍या तरुणाशी लग्न करायचे असेल तर त्याला तीन लाख रुपये द्यावे लागेल. ही रक्कम दिली नाहीतर तो तिचे कोणाशीही लग्न होणार नाही. तीन लाखांच्या खंडणीसाठी तो तिला सतत शिवीगाळ करुन धमकी देत होता. त्याच्याकडून सुरु असलेल्या मानसिक शोषणासह खंडणीच्या धमकीनंतर तिने हा प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितली होती. यावेळी तिच्या वडिलांसह बहिणीला तिला धीर देत पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानतर तिने मुलुंड पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून रुपेश सोनावणे याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रुपेश सोनावणे याच्याविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून रुपेशची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page