व्यवसायासासह चित्रपटासाठी घेतलेल्या अडीच कोटीचा अपहार
दोन व्यावसायिकाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – व्यवसायासह चित्रपटासाठी कर्जाने घेतलेल्या सुमारे अडीच कोटीचा अपहार करुन एका व्यावसायिकाची दोघांनी फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मनिष इंद्रप्रकाश त्रेहान आणि सतवंतसिंग देसराजसिंग मग्गू या दोन्ही व्यावसायिकाविरुद्ध सांताक्रुज पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
निहार रमेश लुंड हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियासोबत खार परिसरात राहतात. त्यांचा पैसे गुंतवणुकीचा व्यवसाय असून त्यांची सांताक्रुज येथे आर बी फायनान्सियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. ऑक्टोंबर २०२२ साली त्यांच्या एका मित्राने त्यांची ओळख मनिषशी करुन दिली होती. मनिषने त्याची एक जाहिरात कंपनी असून या कंपनीत तो त्याच्या पत्नीसोबत पार्टनर आहे. त्याला व्यवसायासाठी एक वर्षांसाठी दोन कोटीची गरज आहे. एक वर्षांत व्याजासहीत त्यांची रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला दोन कोटी कर्जाने दिले होते. एक वर्षांनी त्याने व्याजासहीत पैसे देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याने पैसे परत केले नाही. त्यामुळे त्यांनी आठवण करुन देण्यासाठी त्याला कॉल केला होता. यावेळी त्याने त्यांची ओळख सतवंतसिंगशी करुन देताना तो ऍमेझॉन प्राईमध्ये वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगितले होते. त्याने एका चित्रपटासाठी त्याला पैसे दिले होते.
मात्र चित्रपटाची शूटींग पूर्ण झाले नाही. फायनल एडिटिंगचे काम सुरु आहे. त्यासाठी सतवंतसिंगला ५० लाखांची गरज आहे. पैशांची व्यवस्था झाली नाहीतर त्यांचे चित्रपटासाठी लावलेले सर्व पैसे बुडतील असे सांगून त्यांच्याकडे आणखीन ५० लाखांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी मनिषच्या सांगण्यावरुन सतवंतसिंगला ५० लाख रुपये कर्जाने दिले होते. अडीच कोटी रुपये व्याजासहीत मार्च २०२३ पर्यंत देण्याचे या दोघांनी त्यांना आश्वासन दिले होते. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी त्यांना काही धनादेश दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी व्याजासहीत पैसे दिले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांनी दिलेले धनादेश बँकेत टाकले होते, मात्र बँकेने मनिषच्या सांगण्यावरुन त्यांचे पेमेंट स्टॉप केले होते. त्यानंतर त्यांनी मनिष आणि सतवंतसिंग यांना कॉल केले होते. मात्र त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. या दोघांनी नंतर त्यांचा मोबाईल ब्लॉक केला होता.
व्यवसायासह चित्रपटासाठी कर्जाने दिलेल्या सुमारे अडीच कोटीचा या दोघांनी अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच निहार लुंड यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मनिष त्रेहान आणि सतवंतसिंग मग्गू यांच्याविरुद्घ पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.