मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – ऑनलाईन चालणार्या एका सेक्स रॅकेटचा काळाचौकी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी रेणु इंद्रामणी मल्लाह ऊर्फ शनया ऊर्फ रिम्मी नावाच्या एका महिलेविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहितासह पिटा आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रेणू हा पळून गेल्याने तिचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. हॉटेलमध्ये केलेल्या कारवाईत पोलिसांनी सात तरुणींची सुटका केली असून त्यात एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा समावेश आहे.
रेणू ऊर्फ रिम्मी ही महिला ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवत असून ग्राहकांच्या मागणीनुसार विविध हॉटेल, गेस्ट हाऊस, लॉजमध्ये अल्पवयीन मुलीसोबत काही तरुणींना वेश्याव्यवसायासाठी पाठवत असल्याची माहिती काळाचौकी पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी एका बोगस ग्राहकाच्या मदतीने रेणूला संपर्क साधला होता. तिच्याकडे काही अल्पवयीन मुलीसह तरुणींची मागणी करण्यात आली होती. यावेळी रेणूने फोनवरुनच त्याला लालबागच्या शोभा हॉटेलमध्ये काही तरुणींना पाठवत असल्याचे सांगून त्याच्याशी ऑनलाईन पैशांचा व्यवहार केला होता. ठरल्याप्रमाणे मंगळवारी तिने शोभा हॉटेलमध्ये सात तरुणींना पाठविले होते. मात्र ती तिथे आली नाही. हा प्रकार बोगस ग्राहकाकडून काळाचौकी पोलिसांना समजताच या पथकाने हॉटेलमध्ये छापा टाकून सातही तरुणींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश होता.
चौकशीत रेणूने या मुलीला तिच्या पालकांच्या तावडीतून फुस लावून तिला विविध ग्राहकांसोबत वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले होते. इतर तरुणींना ती विविध हॉटेलमध्ये ग्राहकासोबत पाठवत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. चौदा वर्षांच्या मुलीला बालसुधारगृहात तर इतर सहा तरुणींना देवनार येथील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी रेणू ऊर्फ रिम्मी मल्लाह हिच्याविरुद्ध पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तिच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.