रेल्वे-बसमध्ये गर्दीत मोबाईल चोरी करणार्या दुकलीस अटक
दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार; चोरीचे मोबाईल हस्तगत
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – रेल्वे आणि बसमध्ये गर्दीच्या वेळेस प्रवाशांसह मोबाईलसह इतर मौल्यवान वस्तू चोरी करणार्या एका दुकलीस एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. अर्जुन अशोक गायकवाड आणि मोहम्मद हुसैन सत्तार शेख अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेहा मनिष चव्हाण ही महिला अंधेरी येथे राहते. २४ सप्टेंबरला सकाळी साडेअकरा वाजता ती अंधेरीतील जेव्हीएलआर रोड, नमस्कार बसस्टॉपजवळ होती. बस असल्यानंतर ती बसमध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेऊन तिचा सत्तर हजाराचा आयफोन चोरी करुन पलायन केले होते. घरी आल्यानंतर तिला हा प्रकार समजला होता. मात्र तिने पोलिसात तक्रार केली नव्हती. बुधवारी २ ऑक्टोंबरला तिने हा प्रकार एमआयडीसी पोलिसांना सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन अर्जुन गायकवाड आणि मोहम्मद हुसैन शेख या दोघांना अटक केली. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यातील अर्जुनविरुद्ध कुर्ला पोलीस ठाण्यात अकरा, ठाणे रेल्वेत चार, बोरिवली रेल्वे तीन, दहिसर व वसई रेल्वेत प्रत्येकी दोन, समतानगर, ओशिवरा, कुरार, राबोडी पोलीस ठाण्यात २६ तर मोहम्मद हुसैनविरुद्ध वाकोला, रबाले पोलीस ठाण्यात तीन जबरी चोरीच्या गुन्ह्यांतील नोंद आहे. ते दोघेही रेल्वे आणि बसमध्ये गर्दीच्या वेळेस मोबाईलसह इतर वस्तू चोरी करतात.
दुसर्या घटनेत अब्दुल शफी रफिक शेख या आरोपीस अंधेरी पोलिसांनी अटक केली. अल्लाउद्दीन जलालउद्दीन हा तरुण कुर्ला येथे राहत असून टेक्निशियन म्हणून काम करतो. बुधवारी सायंकाळी तो कामानिमित्त कुर्ला येथून अंधेरीला आला होता. काम संपल्यानंतर तो बसच्या रांगेत उभा होता. यावेळी अज्ञात व्यक्तीने त्याच्यासह अमादअली इंद्रीय या दोघांकडील तीस हजार रुपयांचे तीन मोबाईल चोरी केले होते. हा प्रकार समजताच या दोघांनी मोबाईल चोरी करुन पळून जाणार्या अब्दुल शेख या ३८ वर्षांच्या आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे तिन्ही मोबाईल जप्त केले आहेत. अब्दुल हा जोगेश्वरी येथे राहत असून तो कपडे विक्रीचे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.