कोल्ड प्लेच्या बोगस तिकिटांच्या विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल
बोगस ऍपसह बेबसाईटच्या मदतीने लाखो रुपयांची फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – कोल्ड प्लेच्या बोगस तिकिट विक्री करुन लाखो रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्यानतर आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु असतानाच आता बुक माय शोच्या वतीने अज्ञात व्यक्तीविरुद्ध विलेपार्ले पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर विलेपार्ले पोलिसांनी संबंधित अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह बोगस तिकिटांच्या विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अज्ञात व्यक्तीने बोगस ऍप आणि वेबसाईटच्या माध्यमातून लाखो रुपयांची तिकिटांची विक्री करुन बुक माय शोची फसवणुक केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.
बुक माय शो हे चित्रपटासह इव्हेंटसाठी तयार करण्यात आलेले एक ऑनलाईन प्लेटफॉर्म आहे. जानेवारी २०२५ साली नवी मुंबईत ब्रिटीश रॉक बँड कोल्ड प्लेच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे. या कार्यक्रमांसाठी बुक माय शो पार्टनर आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या तिकिटांची विक्रीची जबाबदारी बुक माय शोला देण्यात आली होती. या कार्यक्रमांची अधिकृत तिकिट विक्री कंपनीच्या माध्यमातून सुरु होते. विशेष म्हणजे बोगस तिकिटापासून सावध राहण्याचे आवाहनही कंपनीकडून करण्यात आले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यांत कंपनीने कार्यक्रमांच्या तिकिट विक्रीला सुरुवात केली होती. तिकिटाची विक्री ऑनलाईन होती, कोणााही फिजिकल तिकिट विक्री केली जात नव्हती. प्रत्येक व्यवहारात केवळ चार तिकिटांची विक्री केली जात होती. मात्र तिकिट विक्री सुरु होताच कंपनीची वेबसाईट अचानक काही काळासाठी डाऊन झाली होती. याच दरम्यान अज्ञात व्यक्तीकडून मेलद्वारे काही तिकिटांची मागणी करण्यात आली होती, मात्र कंपनीने ती मागणी फेटाळून लावली होती.
याच दरम्यान कंपनीला काही अज्ञात व्यक्तीकडून बोगस ऍप आणि वेबसाईटच्या माध्यमातून कार्यक्रमांच्या बोगस तिकिटांची विक्री केल्याचे दिसून आले. या तिकिट विक्रीतून कंपनीची लाखो रुपयांची आर्थिक फसवणुक झाली होती. हा प्रकार लक्षात येताच कंपनीच्या वतीने विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित आरेापीविरुद्ध पोलिसांनी विविध भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे या घोटाळ्याची तक्रार प्राप्त होताच आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरु केला आहे. याच गुन्ह्यांत बुक माय शोच्या काही वरिष्ठ अधिकार्यांना चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले होते. आर्थिक गुन्हे शाखेकडून हा तपास सुरु असताना आता कंपनीने विलेपार्ले पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली आहे. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपासही आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येणार आहे. अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन तिकिटासाठी अनेकांकडून पैसे घेतले होते. मात्र कंपनीकडून तिकिट मिळाले नाही, त्यातून त्याने बोगस ऍप आणि वेबसाईटच्या मदतीने बोगस तिकिटांची विक्री केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.