जोगेश्वरी-गोरेगावातील तीन बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश
कर्जासह प्रतिबंधित औषधांच्या बहाण्याने विदेशी नागरिकांची फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – कर्ज मिळवून देतो असे सांगून ग्राहकांची फसवणुक तसेच प्रतिबंधित औषधांची विक्रीचे आमिष दाखवून विदेशी नागरिकांची फसवणुक सुरु असलेल्या जोगेश्वरी आणि गोरेगाव परिसरातील तीन बोगस कॉल सेंटरचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. या तिन्ही कॉल सेंटरमधून पोलिसांनी ३६ जणांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
जोगेश्वरी आणि गोरेगाव परिसरात काही बोगस कॉल सेंटर सुरु असून या कॉल सेंटरमध्ये अनेकांना कर्जासह प्रतिबंधिक औषधांच्या नावाने गंडा घातला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. कॉल सेंटरच्या माध्यमातून भारतीयासह विदेशी नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त होताच वरिष्ठांनी त्याची गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला संबंधित कॉल सेंटरमध्ये छापा टाकून कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर युनिट दहाच्या अधिकार्यांनी जोगेश्वरीतील लिंक रोड, बेहरामबागच्या रेंज हाईट्स इमारतीच्या अकराव्या मजल्यावरील गेट फार्मासी एलएलपी कार्यालयाच्या ११५० फ्लॅट तसेच आठव्या मजल्यावरील ऑल बिन इन्फो मिडीया प्रायव्हेट लिमिटेडच्या रुम क्रमांक ८०२ फ्लॅटमध्ये एकाच वेळीच कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी कॉलसेंटरच्या दोन मालकासह दहा सेल्स ऑपरेटर अशा बाराजणांना अटक केली. त्यांच्याकडून बारा संगणक, लॅपटॉपच्या हार्डडिस्क, दोन मोबाईल फोन, संगणकाला जोडलेले सहा हेडफोन माईक जप्त केले. या दोन्ही कॉल सेंटरमध्ये विदेशी नागरिकांना कॉल करुन प्रतिबंधित औषधांच्या विक्रीच्या बहाण्याने गंडा घातला होता. त्यांना डॉलर स्वरुपात पैसे विविध बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले जात होते. या आरोपींनी आतापर्यंत अनेक विदेशी नागरिकांची लाखो रुपयांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अशा प्रकारे या टोळीने महाराष्ट्रासह केंद्र सरकारचा महसूल बुडविला होता.
ही कारवाई ताजी असताना युनिट बाराच्या अधिकार्यांनी गोरेगाव येथील आरे कॉलनी, रॉयल पाल्मसच्या मास्तरमाईंड या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी कॉल सेंटरच्या मालकासह एक अकाऊंटट, चौदा पुरुष व आठ महिला अशा बावीस कॉलर-टिम लीडर अशा चोवीसजणांना अटक केली. या ठिकाणी धनसुविधा फायानान्स नावाने फायनान्स कंपनी सुरु करुन तिथे काम करणारे कर्मचारी अनेकांना कर्जाचे आमिष दाखवत होते. कर्जासाठी प्रोसेसिंग फीसह विविध कारणासाठी पैशांची मागणी करत होते. त्यांच्याकडून पैसे घेतल्यानंतर कर्ज न देता त्यांची फसवणुक करत होते. अशा प्रकारे एकाच दिवशी तीन बोगस कॉल सेंटरचा गुन्हे शाखेने पर्दाफाश करुन ३६ जणांना अटक केली. याच गुन्ह्यांत ते सर्वजण कोठडीत असून त्यांची पोलिसाकडून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंतच्या चौकशीत गेल्या दोन वर्षांपासून संबंधित कॉल सेंटर सुरु होते. या दरम्यान त्यांनी अनेक भारतीयासह विदेशी नागरिकांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत राजे, राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सावंत, युनिट बाराचे प्रभारी पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्यासह पोलीस निरीक्षक मनोज सुतार, बाळासाहेब राऊत, सचिन जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रासकर, मोहिते, निलोफर शेख, धनराज चौधरी, गणेश तोडकर, रोहित नार्वेकर, सहाय्यक फौजदार बागवे, खान, पोलीस हवालदार कल्पेश सावंत, चव्हाण, लिम्हण, संतोष राणे, बने, मोरे, बिचकर, अमोल राणे, गोमे, गोरुले, सोनावणे, धारगळकर, माने, खरात, चवरे, शिंदे, पानसरे, पोलीस शिपाई ठोंबरे, डफळे, धोत्रे, निर्मळे, पोलीस शिपाई स्वाती सोनावणे, वाघमारे, पोलीस शिपाई चालक प्रकाश चव्हाण, सकपाळ यांनी केली.