मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – महााराष्ट्रासह उत्तरप्रदेश, जम्मू-काश्मीर, आसाम आणि दिल्ली अशा पाच राज्यात एकाच वेळेस २२ ठिकाणी शनिवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने धडक कारवाई केली. महाराष्ट्रात एनआयएने स्थानिक एटीएस अधिकार्यांच्या मदतीने जालना, मालेगाव, संभाजीनगरात कारवाई करुन चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून ते चौघेही जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचा संशय आहे. त्यांच्यासाठी दशहतवादी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचे प्राथमिक पुरावे हाती सापडले असून त्यांची एनआयए-एटीएसकडून कसून चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.
२ ऑक्टोंबरला जैशच्या दहशतवाद्यांनी राजस्थानातील आठ रेल्वे स्थानकात बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिली होती. या धमकीची केंद्रीय गृहविभागाने गंभीर दखल घेत एनआयएला तपासाचे आदेश दिले होते. तपासादरम्यान जैशच्या संपर्कात काहीजण असल्याचे उघडकीसआले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर या पथकाने स्थानिक एटीएस अधिकार्यांच्या मदतीने शनिवारी जालना, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात अचानक शोधमोहीम हाती घेतली होती. या कारवाईत या अधिकार्यांनी जैशशी संबंधित असलेल्या चौघांना ताब्यात घेतले होते. त्यात मालेगाव येथील एका होमिओपॅथी क्लिनिकमधून तिघांचा तर जालना येथून एका व्यावसायिकाचा समावेश आहे. दशहतवादी कारवायांमध्ये या चारही संशयितांचा सहभाग उघडकीस आला होता. जैशच्या दशहतवाद्यांना मदत करणे, टेरर फंडिंग, दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय भाग घेणे आदी त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची सध्या एनआयए आणि एटीएस अधिकार्यांकडून चौकशी सुरु आहे.
महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर, उत्तरप्रदेश, आसाम, दिल्ली या चार राज्यात अशाच प्रकारे एनआयए आणि एटीएसने कारवाई केली होती. एकूण २२ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली होती. या दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करणार्या एका वृत्तवाहिन्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. संशयित चारही आरोपींची एनआए-एटीएसने संयुक्तपणे चौकशी सुरु केली असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांच्या चौकशीनंतर याच प्रकरणात आगामी दिवसांत आणखीन काहीजणांची चौकशी होणार आहे. गेल्या काही महिन्यांत जैश ही दहशतवादी संघटना पुन्हा सक्रिय झाली असून या संघटनेने संबंधित आरोपींच्या मदतीने देशभरात विशेषता काही प्रमुख शहरात घातपात घडविण्याचे मनसुबे सुरु केल्याचे बोलले जाते.